ड्रायव्हरच्या आत्महत्याप्रकरणी भाजप खासदारावर गुन्हा दाखल झाल्याची घटना कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे समोर आली आहे. चालकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजप खासदार के. सुधाकर आणि इतर दोन जणांची नावे घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी खासदार सुधाकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सकाळी एम. बाबू नावाच्या चालकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. बाबूच्या पत्नीने, शिल्पा यांनी सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी सुधाकर आणि इतर दोन आरोपी, नागेश आणि मंजुनाथ यांच्यावर आर्थिक फसवणूक, आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
(नक्की वाचा- Supriya Sule: उद्धव ठाकरे दिल्लीत आणि सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट! कारण काय?)
सुसाईड नोटमध्ये काय आहे?
बाबूने आपल्या सुसाईड नोटमध्ये आरोप केला आहे की, सुधाकर आणि नागेश यांनी त्याला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 25 लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच जिल्हा परिषदेच्या एका लेखा सहाय्यकानेही त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेत कंत्राटी चालक म्हणून काम करत होता. पोलीस अधीक्षक कुशल चौकसे यांनी सांगितले की, "सकाळी 8.30 वाजता चिक्कबल्लापूर डीसी कार्यालयाच्या परिसरात एका व्यक्तीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली.हे गंभीर आरोप आहेत. खासदार थेट यात सहभागी होते की त्यांच्या नावाचा गैरवापर झाला, याचा तपास केला जाईल. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत."
(नक्की वाचा- Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचे पुन्हा मंत्रिमंडळात कमबॅक होणार? पडद्यामागे मोठ्या घडामोडी)
खासदार सुधाकर यांनी आरोप फेटाळला
दरम्यान, दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार के. सुधाकर यांनी बाबूच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले, परंतु या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. "मला या घटनेबद्दल ऐकून खूप दुःख झाले आहे. मी या बाबू नावाच्या व्यक्तीला माझ्या सार्वजनिक जीवनात कधीही भेटलेलो नाही किंवा पाहिलेले नाही," असे सुधाकर म्हणाले. ते म्हणाले की, इतर दोघांनी बाबूला नोकरीचे आमिष दाखवून ₹10-15 लाख घेतले असल्याचे मी ऐकले आहे, परंतु त्या दोघांनाही मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही."