विमानाने प्रवास करणं कोणाला आवडत नाही? एकदा तरी विमानाने प्रवास करता येईल हे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. मात्र विमानाचं तिकीट महाग असल्याकारणाने प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. एखाद्या सामान्य व्यक्तीला केवळ विमान प्रवासासाठी हजारो रूपये जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे विमानाऐवजी प्रवासासाठी स्वस्त पर्याय शोधले जातात. जर तुम्हाला सांगितलं की, अवघ्या 150 रुपयात तुम्ही विमानाने प्रवास करू शकता, तर तुमचा विश्वास बसेल? मात्र हे शंभर टक्के खरं आहे. आज आपण अशाच मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत, तिथं तुम्ही 150 रुपयात आपलं स्वप्न पूर्ण करू शकता.
दोन शहरांमधील विमानाचा प्रवास अवघ्या 150 रुपयात...
आसाममध्ये लीला बाडी ते तेजपूरपर्यंत विमानाचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला केवळ 150 रुपये मोजावे लागतील. या दोन्ही शहरांतील विमानाचा प्रवास अवघ्या 50 मिनिटात पूर्ण करू शकता. केवळ याच मार्गावर नाही तर असे अनेक मार्ग आहेत, जिथं मूळ भाडं 1000 रुपयांपेक्षाही कमी आहे. हे सर्व प्रादेशिक हवाई संपर्क योजनेंतर्गत कार्यरत आहेत. हे एअरलाइन ऑपरेटर्सना विविध सवलती देते.
ट्रॅव्हल पोर्टल 'इक्सिगो' च्या एका वृत्तानुसार, कमीत कमी 22 मार्गांवरील विमानाचं भाडं प्रति व्यक्ती 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. आसाममध्ये लीलाबाडी आणि तेजपूरला जोडणाऱ्या उड्डाणांनासाठी एका वेळेसच्या मार्गासाठी भाडं कमीत कमी 150 रुपये आहे. अलायन्स एअर या मार्गावरील उड्डाणे चालवतात आणि तिकीट बुक करताना सुविधा शुल्क देखील मूळ भाड्यात जोडले जाते.
अधिकतर मार्गावर 150 ते 199 रुपयांपर्यंत भाडं...
या भागात स्थानिक जोडणी योजनेअंतर्गत विमानांच्या उड्डाणांचा अवधी 50 मिनिटांपर्यंत आहे. ही ठिकाणं भारताच्या पूर्वेकडील भागात असून अधिकांशी मार्गावरील मूळ भाडं 150 ते 199 रुपये प्रति व्यक्ती आहे. याशिवाय दक्षिणेत बंगळुरू-सलेम, कोचीन-सलेम सारख्या मार्गांवरही मूळ तिकिटांची किंमत कमी आहे.
हे ही वाचा- गावात थंडीत नसतो सूर्यप्रकाश; गावकऱ्यांनी पृथ्वीवरच आणला सूर्य !
गुवाहाटी आणि शिलाँगहून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांचं भाडं 400 रुपये आहे. इम्फाल-आयजोड, दीमापूर-शिलाँग आणि शिलाँग-लीलाबाडी उड्डाणांसाठी 500 रुपये, बंगळुरू-सलेम विमानाच्या प्रवासासाठी 525 रुपये, गुवाहाटी-पासीघाटसाठी 999 आणि लीलाबाडी-गुवाहाटीसाठी 954 रुपये भाडं आकारलं जातं.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विमानतळ प्रादेशिक उड्डाण सेवा यांच्याकडून या उड्डाणांसाठी विविध सवलती दिल्या जातात. इतर गोष्टींबरोबरच या फ्लाइट्ससाठी कोणतेही 'लँडिंग' किंवा 'पार्किंग' चार्ज घेतले जात नाहीत. नागरी उड्डाण मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2016 रोजी प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजनेला चालना देण्याच्या आणि हवाई प्रवास अधिक स्वस्त करण्याच्या उद्देशाने UDAN सेवा सुरू केली आहे.