Kerala News : केरळमध्ये ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा'मुळे होणाऱ्या प्रायमरी अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटिस (PAM) या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केरळच्या आरोग्य विभागाने या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी केला आहे. या वर्षी आतापर्यंत या संसर्गाची 69 प्रकरणे समोर आली असून, त्यापैकी 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यातील अनेक मृत्यू अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये झाले आहेत. त्यामुळे राज्यासमोर एक गंभीर आव्हान उभे राहिले आहे.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संसर्ग सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरमसारख्या जिल्ह्यांमध्ये विशिष्ट भागांपुरता मर्यादित होता. मात्र, आता राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी त्याची प्रकरणे समोर येत आहेत. यात तीन महिन्यांच्या बाळापासून ते 91 वर्षांच्या वृद्धांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे. आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षीची प्रकरणे एकाच जलस्रोताशी संबंधित नाहीत, ज्यामुळे तपास करणे अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
(नक्की वाचा- Aluminium Foil Vs Butter Paper: अॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर, जेवणाच्या डब्यासाठी कशाचा वापर करावा?)
अमिबापासून बचाव कसा करायचा?
‘नेगलेरिया फाउलेरी' (Naegleria fowleri) नावाचा हा अमिबा थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. हा अमिबा दूषित पाण्यावाटे (Contaminated Water) नाकामध्ये प्रवेश करतो आणि संसर्ग होतो त्यानंतर तो मेंदूपर्यंत पोहोचतो. ज्यामुळे मेंदूला गंभीर सूज येते. याची लक्षणे म्हणजे तीव्र डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलटी अशी आहेत. आजार बळावल्यास झटका येणे किंवा बेशुद्ध होणे असे प्रकार घडतात.
या संसर्गाचा लवकर शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मंत्री जॉर्ज यांनी सांगितले. केरळमध्ये या संसर्गातून वाचलेल्या रुग्णांचे प्रमाण 24 टक्के आहे. तर जागतिक सरासरी फक्त 3 टक्के आहे. वेळेवर निदान आणि ‘मिल्टेफोसिन' या औषधाचा उपयोग केल्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
(नक्की वाचा: Soaked Raisin Benefits: 1 महिना सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्यास काय होईल?)
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
-
तलाव, नद्या आणि जलाशयांसारख्या स्थिर पाण्याच्या स्रोतांमध्ये पोहणे किंवा आंघोळ करणे टाळावे.
-
अशा पाण्यात जाताना नाक बंद ठेवणे किंवा नोज क्लिपचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
-
सार्वजनिक विहिरी आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये योग्य प्रमाणात क्लोरीन टाकून स्वच्छता राखवी.
-
दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.