अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेयरचं नाव केंद्र सरकारनं बदललं आहे. आता ही राजधानी 'श्री विजयपुरम' या नावानं ओळखली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन ही घोषणा केलीय. पोर्ट ब्लेयरमधील तुरुंगातच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. त्यामुळे या शहराबद्दल सर्व भारतीयांच्या मनात खास भावना आहेत. अमित शाह यांनी केलेल्या घोषणेमध्येही सावरकरांसह नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही उल्लेख केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित शाह यांनी या निर्णयाची माहिती देताना केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ' देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांमधून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पापासून प्रेरणा घेत आज गृह मंत्रालयानं पोर्ट ब्लेयरचं नाव 'श्री विजयपुरम' करण्याचा निर्णय घेतला आहे. 'श्री विजयपुरम' हे नाव आपल्या स्वातंत्र्याचा संघर्ष आणि त्यामधील अंदमान आणि निकोबारचे योगदान दर्शवते.'
केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढं लिहलं आहे की, 'या बेटाचं देशाचे स्वातंत्र्य आणि इतिहासात अद्वितीय स्थान आहे. चोल साम्राज्याच्या नौदलाचा तळ म्हणून निर्णायक भूमिका बजावणारे बेट देशाची सुरक्षा आणि विकासासाठी गती देण्यास तयार आहे. या बेटावर नेताजी सुभाजचंद्र बोस यांनी सर्वात प्रथम तिरंगा फडकावला होता. तसंच सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आहे.'