India-Pakistan Ceasefire : पाकिस्तान चीनला आपला कायमस्वरुपी मित्र मानतो. मात्र पाकिस्तानचा हाच जिगरी मित्र सध्या रागावला आहे. आपल्याला डावलून पाकिस्तान अमेरिकेच्या पाया पडायला गेला हे चीनला आवडलेलं नाही. मागील आठवडाभरात भारत, पाकिस्तान, अमेरिका, चीन यांच्यात काय घडामोडी घडल्या आहेत? चीन पाकिस्तानवर का संतापला आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला भारताची ही कारवाई आवडली नाही. त्यामुळे दहशतवाद्यांची बाजू घेत पाकिस्तानने भारताविरुद्ध थेट युद्ध छेडलं. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देत अक्षरश: पळता भुई थोडी केली.
अखेर चौथ्या दिवशी 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली. परंतु भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि चीन या चार देशांनी या युद्धबंदीबाबत वेगवेगळी विधाने केली, ज्यामुळे हा विषय आणखी गुंतागुंतीचा बनला आहे. पाकिस्तानच्या युद्धबंदीच्या पद्धतीवर चीन नाराज असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धबंदीची घोषणा
दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केल्याचा दावा केला. सोशल मीडियावर ट्वीट करत भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबवल्याचं त्यांनी म्हटलं. ट्रम्प यांनी म्हटलं की म्हणाले, "रात्रभर चर्चा केल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी झाली आहे.' अभिनंदन!"
भारताची भूमिका
पाकिस्तानच्या डीजीएमओने स्वतः भारताच्या डीजीएमओला फोन करून युद्धबंदीची विनंती केली. भारताने पाकिस्तानची ही विनंती मान्य करत दहशतवाद कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही, या अटीवर युद्धबंदीच्या दिशेने पाऊल टाकलं.
भारताने अमेरिकेचा मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीचा निर्णय दोन्ही देशांनी मिळून घेतलेला आहे. अमेरिकेची त्यात कोणतीही भूमिका नाही हे स्पष्ट केलं.
पाकिस्तानने संपर्क न केल्यान चीन नाराज
पाकिस्तान नेहमीच चीनला 'कायस्वरुपी मित्र' म्हणतो. मात्र संकटाच्या काळात पाकिस्तानने प्रथम अमेरिकेशी संपर्क साधला, चीनशी संपर्क साधला नाही. यावर चीनने संताप व्यक्त केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अमेरिकेला प्राधान्य दिले आणि त्याला बाजूला केले याचा चीनला राग आला आहे.
दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करावी आणि जगात शांतताप्रिय राष्ट्र म्हणून आपली इमेज निर्माण करावी, अशी चीनची इच्छा होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्यात हस्तक्षेप केला आणि पाकिस्ताननेही अमेरिकेशी संपर्क साधला. आपला मित्र पाकिस्तानने आपले दार ठोठावले नाही हे पाहून चीनला वाईट वाटले. चीनला या मुद्द्याचा फायदा घेऊन आपली प्रतिमा उंचावता आली असती. यावरून जवळचे मित्र असलेल्या चीन आणि पाकिस्तानमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे.
पाकिस्तानकडून चीनच्या मनधरणीचा प्रयत्न
ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा ड्रोन पाठवले आणि भारतीय हद्दीत घुसखोरी केली. म्हणजेच अमेरिकेच्या युद्धबंदीच्या घोषणेकडे दुर्लक्ष केल्याचं पाकिस्तानने दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दरम्यान पाकिस्तानने चीनसोबतच्या चर्चेबाबत एक प्रेस रिलीज जारी करत म्हटले आहे की, चीनने पाकिस्तानच्या 'संयम आणि जबाबदार वृत्तीचे' कौतुक केले आहे. यानंतरच पाकिस्तानने ड्रोन पाठवणे थांबवले आहे. चीनला खूश करण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलले असे अनेक तज्ञांचे मत आहे.
चीनकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न
दोन दिवसांनंतर, चीनने एक निवेदन जारी करून दावा केला की त्यांचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली होती आणि युद्धबंदीमध्ये ही चर्चा महत्त्वाची होती. चीनने म्हटलं की, 'आम्हाला भारत आणि पाकिस्तानने शांतता राखावी, संवादाद्वारे वाद सोडवावेत आणि परिस्थिती स्थिर करावी अशी आमची इच्छा आहे. चीन दोन्ही देशांशी संपर्क कायम ठेवेल. पुढे चीनने सांगितले की, आम्ही भारत आणि पाकिस्तान दोघांशीही चर्चा केली, आमच्या प्रयत्नांमुळे संघर्ष थांबला आणि शांतता प्रस्थापित झाली. एकंदरीत, अमेरिकेनंतर चीन देखील युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले आहे.