CJP demands after Dharmendra Pradhan resignation: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नीट परीक्षेतील पेपरफुटीनंतर सातत्याने आक्रमक पवित्रा घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) या राजीनाम्याचे जोरदार स्वागत केले आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या जून महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या या संघटनेने प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता थेट दोन मोठ्या आणि प्रमुख केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढं आणि वाढत्या विरोधापुढं अखेर सरकारला नमावं लागल्याची भावना व्यक्त करत सीजेपीने सोशल मीडियावर 'स्टुडंट पॉवर जिंदाबाद' अशी पोस्ट केली आहे. जंतर-मंतरवर जमलेल्या शेकडो आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये राजीनाम्याची बातमी समजताच एकच जल्लोष पाहायला मिळाला. संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, हा लोकशाहीचा विजय आहे आणि विद्यार्थ्यांच्या ताकदीशी कोणीही खेळू नये, असा थेट इशारा दिला.
सीजेपीच्या दोन प्रमुख मागण्या
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सीजेपीने आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करत दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
पहिली मागणी: नीट-युजी 2026 पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आणि गोंधळामुळे ज्या दुर्दैवी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबांना तात्काळ 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि भरपाई देण्यात यावी.
दुसरी मागणी: 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी लाठीमार केला आणि बळाचा वापर केला, त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.
( नक्की वाचा : 'राष्ट्रविरोधी शक्ती गैरफायदा घेतील म्हणून...'; Dharmendra Pradhan यांनी राजीनामापत्रात काय सांगितलं? वाचा... )
लढा सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा
गेल्या काही महिन्यांपासून नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, सीबीआय तपास आणि पुनरपरीक्षेवरून देशातील वातावरण तापले होते. त्यातच जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन आणि विद्यार्थ्यांचा वाढता आक्रोश या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आला आहे. मात्र, केवळ राजीनाम्याने हे प्रकरण शांत होणार नसून पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना न्याय आणि दोषींवर कारवाई मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world