जाहिरात

Narendra Modi : आरक्षण ते आणीबाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधींपर्यंतच्या सरकारमधील घडामोडींचा उल्लेख करीत हल्लाबोल केला. 

Narendra Modi : आरक्षण ते आणीबाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
नवी दिल्ली:

आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधींपर्यंतच्या सरकारमधील घडामोडींचा उल्लेख करीत हल्लाबोल केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे

  1. भारताचा जन्म 1947 मध्ये झाल्याचं संविधान निर्माते मानत नव्हते. मात्र त्यांना भारताच्या महान परंपरेचं भान होतं. भारताची लोकशाही आणि भारताचा प्रजासत्ताक इतिहास जगासाठी प्रेरक राहिला आहे. म्हणूनच भारत मदर ऑफ डेमोक्रसी म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे केवळ विशाल लोकशाही नाही तर  लोकशाहीची जननी आहोत. 
  2. आपला देश जलद गतीने विकास करीत आहे. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने मजबूत पाऊल ठेवत आहे. जेव्हा आम्ही स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरा करून तेव्हा देशाला विकसित भारत बनवू हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आहे. या स्वप्नापासून ते सिद्धीसाठी भारताची एकता महत्त्वाची आहे. आपलं संविधानही भारताच्या एकतेचा आधार आहे. संविधानाच्या निर्मितीत देशातील मोठे दिग्गज, स्वातंत्र्यवीर, सामाजिक कार्यकर्ते, अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समाजातील प्रत्येत वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे होते. 
  3. प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी महिला असतात. संविधानाची 75 वर्षे साजरी करीत असताना चांगली बाब म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींच्या जागी एक आदिवासी महिला आहेत. संसदेत महिला खासदारांची संख्या वाढत आहे. आज सामाजिक, राजकीय, शिक्षण, क्रीडा, सर्जनशील क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात महिलांचं प्रतिनिधित्व देशाचा गौरव वाढविणारं आहे. याची सर्वात मोठी प्रेरणा आपलं संविधान आहे. 
  4. कलम 370 देशाच्या एकतेच्या आड येणारे होते. हे कलम एकतेच्या आड येणारे असल्याने हे कलम आम्ही गाडून टाकले.   कारण देशाची एकता ही आमची प्राथमिकता आहे. 
  5. संविधानाला 25 वर्ष पूर्ण होत असताना, देशात संविधानाचे लचके तोडले जात होते. आणीबाणी लागू केली गेली. देशाला तुरुंग बनविण्यात आले, नागरिकांचे अधिकार हिरावून घेतले गेले, माध्यमांची गळचेपी केली गेली. काँग्रेसच्या कपाळावरील हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही कारण लोकशाहीचा गळचेपी करण्यात आली होती.
  6. देश संविधानाची 50 वर्ष साजरी करत असताना मला संविधानामुळे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. त्याचवेळी मी ठरवलं होतं की संविधानाची 60 वर्ष साजरी करू. इतिहासात हे पहिल्यांदाच झाले की हत्तीवरील अंबारीमध्ये संविधानाला ठेवून गौरव यात्रा काढण्यात आली होती आणि मुख्यमंत्री हत्तीसोबत रस्त्यावरून पायी चालत होता.
  7. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल यांच्या मनात प्रचंड द्वेष भरला होता. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना अलीपूर रस्त्यावर एक स्मारक बनविण्याचे ठरले होते. 10 वर्ष काँग्रेस सत्तेवर असताना या स्मारकाचे काम केलेही नाही आणि होऊ देखील दिले नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही हे स्मारक उभारले. भारतात एकता, अखंडतेसाठी धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ शकत नाही, गहन चर्चा करून हा निर्णय घेतलेला होता. काँग्रेसने सत्तेच्या सुखासाठी, सत्तेच्या भुकेपोटी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खेळ सुरू केला.
  8. काँग्रेसच्या  काळातील पंतप्रधानांनी आरक्षणाला विरोध केला आहे. बाबासाहेबांनी देशाच्या संतुलित समाजासाठी आरक्षण लागू केलं. काँग्रेस गेल्यानंतर ओबीसीला आरक्षण मिळालं. हे काँग्रेसचं पाप आहे. त्याचवेळी ओबीसींना आरक्षण मिळालं असतं तर आज अनेक मोठ्या पदांवर त्या समाजाचे लोक असते. 
  9. काँग्रेसने निरंतर संविधानाचा अवमान केला. संविधानाचं महत्त्व कमी केलं. कलम 35A संसदेत आणल्याशिवाय देशावर लादण्यात आला. ते नसते तर जम्मू कश्मीरमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती, ती निर्माण झाली नसती. देशाच्या संसदेला अंधारात ठेवून हे करण्यात आले. मनात पाप असल्यानेच त्यांनी असे केले.
  10. बेकायदेशीर मार्गाने निवडून आल्याने इंदिरा गांधींची निवड रद्द केली होती, यामुळे राग आल्याने आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांनी आणीबाणी लागू केली. 1975 साली इंदिरा गांधी 39 वा बदल केला केला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अध्यक्ष यांच्या निवडीविरोधात कोणी कोर्टात जाऊ शकत नाही आणि ते देखील पूर्वलक्षी प्रभावाने असा बदल केला. पंडित नेहरू, इंदिरा गांधींची परंपरा राजीव गांधींनीही पुढे चालू ठेवली. समान न्यायाच्या तत्त्वाला नख लावले. शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पंतप्रधान राजीव गांधी यांनी नाकारला आणि मतांच्या लांगुलचालनासाठी  संविधानाच्या तत्त्वाचा बळी दिला आणि कट्टरपंथियांपुढे लोटांगण घातलं. 
  11. मनमोहन सिंह यांनी म्हटले होते की, मला हे स्वीकारावे लागेल की पक्षाध्यक्ष हे सत्तेचे केंद्र आहे. सरकार पक्षाला उत्तरदायी आहे. इतिहासात पहिल्यांदाच संविधानाला मोठी बाधा निर्माण करण्यात आली. पंतप्रधानांच्या वर गैरसंविधानिक, कोणतीही शपथ न घेतलेले राष्ट्रीय सल्लागार मंडळ पंतप्रधान कार्यालयावर आणून बसवले.
  12. मी तथ्य भारतासमोर ठेऊ इच्छितो.. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाचं नुकसान केलं. 75 वर्षात 55 वर्षे एकाच कुटुंबाने राज्य केलं. म्हणून देशात काय काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुनीती याची परंपरा अद्यापही सुरू आहे. प्रत्येक स्तरावर या कुटुंबाने संविधानाला आव्हान दिलं आहे. 1947 ते 1952 या देशात निवडून आलेलं सरकार नव्हतं. एक अस्थायी व्यवस्था होती. निवडणूक झाल्या नाहीत. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था होती. 1952 पूर्वी राज्यसभेचंही गठण झालं नव्हतं. राज्यातही निवडणुका झाल्या नाहीत.
  13. संविधानामुळे माझ्यासारखी अनेक लोकं इथपर्यंत पोहोचू शकलो, कारण आम्हाला कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. संविधान आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. संविधानामुळे आम्हाला एक-दोनवेळा नाही तर तीनवेळा संधी मिळाली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com