पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी लोकसभेत संविधावरील चर्चेला उत्तर दिलं. भारत ही लोकशाहीची जननी असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानाची 75 वर्ष हा देशासाठी संस्मरणीय प्रवास आहे. संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी हा त्याचा आधार आहे. आमच्यासाठी हा उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
संविधानाला 25 वर्ष पूर्ण होत असताना, देशात संविधानाचे लचके तोडले जात होते. आणीबाणी लागू केली गेली. देशाला तुरुंग बनविण्यात आले, नागरिकांचे अधिकार हिरावून घेतले गेले, माध्यमांची गळचेपी केली गेली. काँग्रेसच्या कपाळावरील हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही कारण लोकशाहीचा गळचेपी करण्यात आली होती, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, 'संविधानची अंमलबजावणी लागू होऊन 75 वर्षांचा उत्सव साजरा होत असताना आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी असणे ही चांगली भावना आहे. हे संविधानाशी सुसंगत आहे. प्रत्येक मोठ्या योजनांचे केंद्र महिला आहेत.'
देशाची एकता मजबूत करण्याचा प्रयत्न केला - PM मोदी
पंतप्रधान म्हणाले, 'तुम्ही आमची धोरणं पाहिली तर गेली 10 वर्ष देशातील नागरिकांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. आम्ही देशाची एकता मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कलम 370 देशाच्या एकतेच्या आड येणारे होते. हे कलम एकतेच्या आड येणारे असल्याने हे कलम आम्ही गाडून टाकले. कारण देशाची एकता ही आमची प्राथमिकता आहे.
( नक्की वाचा : इंदिरा गांधी संविधानविरोधी होत्या? श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल, लोकसभेत जोरदार गदारोळ )
देश संविधानाची 50 वर्ष साजरी करत असताना मला संविधानामुळे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. त्याचवेळी मी ठरवलं होतं की संविधानाची 60 वर्ष साजरी करू. इतिहासात हे पहिल्यांदाच झाले की हत्तीवरील अंबारीमध्ये संविधानाला ठेवून गौरव यात्रा काढण्यात आली होती आणि मुख्यमंत्री हत्तीसोबत रस्त्यावरून पायी चालत होता.
संविधानामुळे माझ्यासारखी अनेक लोकं इथपर्यंत पोहोचू शकलो, कारण आम्हाला कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. संविधान आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. संविधानामुळे आम्हाला एक-दोनवेळा नाही तर तीनवेळा संधी मिळाली, असं पंतप्रधानांनी सांगितलं