Daycare washing machine child abuse: रडणाऱ्या चिमुरड्यांना गप्प करण्यासाठी थेट फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये बसवणे, त्यांच्या तोंडावर टॉयलेट जेट स्प्रेने पाण्याचे फवारे मारणे आणि त्यांना बाथरुममध्ये कोंडून ठेवणे, अशा अंगावर काटा आणणाऱ्या अमानुष छळाचा प्रकार एका डे केअर सेंटरमध्ये समोर आला आहे.
केवळ 2 ते 3 वर्षांच्या निष्पाप बालकांसोबत काळजीवाहू महिलांनीच केलेल्या या क्रूर वर्तनामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या या छळाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.
आयटी कंपनीच्या कॅम्पसमधील धक्कादायक घटना
हा संतापजनक प्रकार बेंगळुरू येथील 'कॅपजेमिनी' या प्रसिद्ध आयटी कंपनीच्या एचएएल (HAL) कॅम्पसमध्ये असलेल्या डे केअर सेंटरमध्ये घडला आहे. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पोटच्या गोळ्यांना सुरक्षित राहतील या विश्वासाने येथे सोडले होते. या सेंटरमध्ये तब्बल 50 ते 60 मुलांची नोंदणी असून दररोज 15 ते 20 लहान मुले येथे येत असत.
मात्र, याच ठिकाणी मुलांचा पद्धतशीरपणे छळ सुरू होता. याप्रकरणी सेंटरमधील 5 महिला कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित आयटी कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून हे डे केअर सेंटर तात्पुरते बंद केले आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : सकाळी शाळेसाठी निघाल्या अन् घरी आल्याच नाहीत; 4 मुलींच्या अचानक गायब होण्यामागचं सत्य काय? )
माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यालाच नोकरीवरून काढले
जिल्हा बालसंरक्षण अधिकारी टिळकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अमानुष प्रकार येथे बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. यापूर्वी देखील एका कर्मचाऱ्याने येथील पर्यवेक्षकाला या छळाची माहिती देऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याऐवजी माहिती देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यालाच नोकरीवरून काढून टाकले होते. यामुळे येथील लहान मुलांचा छळ अधिकच वाढला. अखेर या छळाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर बाल हेल्पलाईनच्या मदतीने पोलिसांत तक्रार करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केवळ 2 वर्षांची निष्पाप मुले वॉशिंग मशीनमध्ये बसलेली आणि त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गंभीर प्रकारानंतर कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडे स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंपनीने प्रशासनाला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या अमानुष कृत्यामुळे कॉर्पोरेट कॅम्पसमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालसंगोपन केंद्रांच्या देखरेखीवर आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याण हादरले! कर्ज मंजूर झाल्याचे सांगून महिलेला घरात बोलावले, दरवाजा बंद केला आणि पुढे... )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world