
Vice President Election Result : देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (9 सप्टेंबर) रोजी मतदान झालं. त्यानंतर लगेच झालेल्या मतमोजणीमध्ये राधाकृष्णन विजयी झाले.
सीपी राधाकृष्णन यांना 452 तर विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. तर 15 मतं अवैध ठरली.
किती मतदान झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह 769 खासदारांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. उपराष्ट्रपती निवडणुकीत एकूण 98 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजता मतदान संपल्यानंतर, 6 वाजता मतमोजणी सुरू झाली. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य या निवडणुकीत भाग घेतात आणि यामध्ये कोणताही व्हिप (whip) जारी केला जात नाही.
उपराष्ट्रपती निवडणूक का झाली?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणांमुळे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता, जरी त्यांचा कार्यकाळ 2 वर्षे बाकी होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक झाली. यावेळी दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातले होते. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे, तर रेड्डी हे तेलंगणाचे होते.
( नक्की वाचा : Vice President Election FAQ : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक: मतदान कसं होतं, कोण करतं? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे )
कोण आहेत राधाकृष्णन ?
उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या गौंडर या प्रमुख ओबीसी जातीचे आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संबंधित आहे. 2023 मध्ये राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर जुलै 2024 मध्ये त्यांची महाराष्ट्रात बदली करण्यात आली. त्यांच्या आधीच्या उपराष्ट्रपती धनखड यांच्या उलट, राधाकृष्णन यांनी राज्यपाल म्हणून वादग्रस्त राजकीय मुद्द्यांवर सार्वजनिकरित्या टिप्पणी करणे टाळले आहे. ते 1998 मध्ये पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून आले आणि 1999 मध्ये पुन्हा याच जागेवरून लोकसभेवर निवडून आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world