
Vice President Election FAQ : भारतात उपराष्ट्रपती पद हे राष्ट्रपतींनंतरचे दुसरे सर्वात मोठे संवैधानिक पद आहे. 17 व्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी 9 सप्टेंबर, मंगळवारी मतदान होणार आहे. एनडीएच्या वतीने सीपी राधाकृष्णन आणि विरोधी आघाडीच्या वतीने पी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार या निवडणुकीत मैदानात आहेत. मंगळवारीच मतमोजणीनंतर विजेत्याचे नाव जाहीर केले जाईल. जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. उपराष्ट्रपती निवडणूक कशी होते, कोण मतदान करते, दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई होते का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे (FAQ) आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मतदान कसे होईल, निकाल कधी लागेल?
यावेळी उपराष्ट्रपती निवडणुकीत दोन उमेदवार आहेत. मतदानासाठी राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांची रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान संसद भवनच्या रूम नंबर F-101, वसुधा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. मतदान संपल्यानंतर एका तासाने म्हणजेच सायंकाळी 6 वाजता मतांची मोजणी सुरू होईल आणि निकाल जाहीर केला जाईल.
( नक्की वाचा : B.Sudarshan Reddy: सुदर्शन रेड्डी यांना विरोधकांनी उपराष्ट्रपतीचा उमेदवार का बनवले? वाचा संपूर्ण गेम प्लॅन )
कोण मतदान करू शकतो?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांतील (राज्यसभा आणि लोकसभा) सदस्य मतदान करतात. राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यही मतदानासाठी पात्र असतात. 17 व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात राज्यसभेचे 233 निवडून आलेले सदस्य (सध्या 5 जागा रिक्त), राज्यसभेचे 12 नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे 543 निवडून आलेले सदस्य (सध्या एक जागा रिक्त) यांचा समावेश आहे. निर्वाचक मंडळात एकूण 788 सदस्य आहेत (सध्या 781).
उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे होते?
उपराष्ट्रपती निवडणूक 'आनुपातिक प्रतिनिधित्वा'च्या पद्धतीने होते. मतदान गुप्त पद्धतीने 'सिंगल ट्रान्सफरेबल व्होट सिस्टम'द्वारे (Single Transferable Vote System) केले जाते. मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असते. त्यात दोन कॉलम असतात. एका कॉलममध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये उमेदवारांची नावे आणि दुसऱ्या कॉलममध्ये मत देण्यासाठी जागा रिकामी असते. रिकाम्या जागेत मतदारांना आपली पसंती 1, 2... अशा क्रमांकांमध्ये नोंदवावी लागते. हे आकडे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असू शकतात.
( नक्की वाचा : Nepal Unrest : नेपाळमध्ये फेसबुक, यूट्यूबवर बंदी: ‘Gen-Z' रस्त्यावर; आंदोलक संसदेत घुसले )
टपाल किंवा इतर मार्गाने मतदान करता येते का?
उपराष्ट्रपती निवडणुकीत यासाठी परवानगी नसते. निर्वाचक मंडळातील सदस्यांना स्वतः उपस्थित राहून गुप्त मतदान करावे लागते. मतदान करताना कुणाचीही मदत घेता येत नाही. एखादा खासदार प्रतिबंधात्मक कोठडीत (Preventive Detention) असेल, तरच तो टपालाने (Postal Ballot) आपले मत देऊ शकतो. सध्याच्या निवडणुकीत शेख अब्दुल रशीद (बारामुल्ला) आणि अमृतपाल सिंह (खडूर साहिब) हे दोघे कारागृहात असल्याने ते टपाल मतदानासाठी पात्र आहेत.
मतांची मोजणी कशी होते?
- जितकं मतदान होतं त्यापैकी सर्वात आधी वैध मते वेगळी केली जातात.
- त्यानंतर, वैध मतांमधील पहिल्या पसंतीची मते मोजली जातात.
- कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या 50% पेक्षा जास्त मते मिळाली तर त्याला विजयी मानले जाते.
- पहिल्या फेरीत कुणालाही बहुमत मिळाले नाही, तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाहेर केले जाते.
- त्याची मते पुढील पसंतीनुसार इतर उमेदवारांना हस्तांतरित केली जातात.
- जोपर्यंत एखाद्या उमेदवाराला बहुमत मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा-पुन्हा केली जाते.
पक्षांतरबंदी कायदा लागू होतो का?
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. त्यामुळे कोणताही पक्ष ‘व्हिप' जारी करत नाही. यामुळे सदस्य आपल्या मनाप्रमाणे कुणालाही मतदान करू शकतात. अशा परिस्थितीत, पक्षांतरबंदी कायद्याचे नियम येथे लागू होत नाहीत.
या निवडणुकीतही अनामत रक्कम जप्त होते का?
होय, उपराष्ट्रपती निवडणुकीतही अनामत रक्कम जप्त होण्याची तरतूद आहे. जर कोणत्याही उमेदवाराला वैध मतांच्या सहाव्या भागापेक्षाही कमी मते मिळाली, तर त्याची 15,000 रुपयांची अनामत रक्कम जप्त केली जाते. इतर प्रकरणांमध्ये अनामत रक्कम परत मिळते.
उपराष्ट्रपती निवडणुकीला आव्हान देता येते का?
होय. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. ही याचिका एखाद्या उमेदवाराद्वारे किंवा निर्वाचक मंडळाच्या 10 किंवा त्याहून अधिक सदस्यांद्वारे दाखल केली जाऊ शकते. निकालाला फक्त 30 दिवसांच्या आतच आव्हान दिले जाऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world