रामराजे शिंदे, दिल्ली: काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याचा खळबळजनक दावा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी केला आहे. आसन क्रमांक 222 वर सफाई कर्मचाऱ्याला ही रोख रक्कम मिळाल्याचे सांगण्यात येत असून हे आसन काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या खळबळजनक दाव्याने राज्यसभेत काँग्रेस- भाजप आमने सामने आले असून याप्रकरणी चौकशी करणार असल्याचेही सभापतींनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यसभेमध्ये काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनाखाली नोटांचे बंडल सापडल्याचा दावा केला. ५ डिसेंबर रोजी कामकाज तहकूब केल्यानंतर एका जागेतून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले असल्याची माहिती धनखर यांनी सभागृहाला दिली.
हे आसन तेलंगणातील राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांचे आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटले. यावरुनच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. तुम्हीही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत आहात, त्यामुळे जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आणि त्याची सत्यता सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणाचेही नाव घेऊ नका, असे म्हणत त्यांनी धनखड यांना खडेबोल सुनावले.
नक्की वाचा: राजकारणात वारं फिरलं; हर्षवर्धन पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट?
दरम्यान, याप्रकरणी अभिषेक मनु सिंघवी यांनी याप्रकरणाचा खुलासा करताना ही रोख रक्कम आपली नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्याकडे फक्त 500 रुपयांची नोट होती. मी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो आणि तेथून 1 वाजता निघालो, त्यानंतर मी 1.30 वाजता कॅन्टीनमध्ये बसलो आणि त्यानंतर मी संसदेतून बाहेर पडलो, असं त्यांनी सांगितले आहे.