देवा राखुंडे: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता महायुतीकडे इनकमिंग सुरु झाल्याचे दिसत आहे. याचा पहिला धक्का शरद पवार यांना बसण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा आहे. अंकिता पाटील यांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे या चर्चा रंगताना दिसत आहेत.
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेत्यांनीही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छांचे संदेश दिले. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतल्याची चर्चा आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आपल्या एक्स हँडलवर फडणवीसांसोबत भेटीचा फोटो देखील पोस्ट केला. यावेळी हर्षवर्धन पाटील त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील मुलगा राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे या फोटोत दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला आहे. त्यामुळे, या ताबडतोब भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 07 आँक्टोंवर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी इंदापूर विधानसभेत दत्ता भरणे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. अशातच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो जुना असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप हर्षवर्धन पाटील यांच्याकडून किंवा अंकिता पाटील यांच्याकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world