Nitin Gadkari News: देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनाचा खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. दिल्लीत येणाऱ्या काळात बसेस चालवण्यासाठी पारंपरिक इंधनाचा वापर न करता, म्युनिसिपल कचऱ्यापासून तयार केलेल्या 'ग्रीन हायड्रोजन'चा (Hydrogen) इंधन म्हणून वापर केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
भाजपच्या एका युवा संमेलनात बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. भविष्यात गाड्या चालवण्यासाठी केवळ पाणी आणि कचऱ्यापासून बनवलेल्या हायड्रोजनचा वापर केला जाईल, अशा एका नव्या युगाची कल्पना त्यांनी मांडली.
कचऱ्यापासून बस चालवणे खरोखरच शक्य आहे का? असा प्रश्न जेव्हा गडकरींना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. संमेलनाला संबोधित करताना ते म्हणाले, "लोक मला विचारतात की हे कसं शक्य होईल? पण मी त्यांना विचारू इच्छितो की, गेल्या 50 वर्षांत मी केलेली अशी कोणती भविष्यवाणी आहे जी खरी ठरलेली नाही?" आपल्या कामाच्या आणि नियोजनाच्या जोरावर हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Live: महान शिक्षाविद, प्रखर राष्ट्रवादी विचारक एवं जनसंघ के संस्थापक श्रद्धेय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी की 125वीं जयंती के उपलक्ष में युवा सम्मेलन। @nitin_gadkari @hdmalhotra @gupta_rekha https://t.co/ZJ4TI3JDbr
— BJP Delhi (@BJP4Delhi) July 6, 2026
(नक्की वाचा- Dombivli News: शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण)
2027 पर्यंत देशातून कचरा पूर्णपणे साफ करणार
नितीन गडकरी यांनी कचरा व्यवस्थापनाच्या अनेक यशस्वी प्रकल्पांची उदाहरणे यावेळी दिली. दिल्लीतील विविध लँडफिल साइट्सवरून तब्बल 80 लाख टन कचरा आधीच उचलण्यात आला असून, त्याचा वापर एक्स्प्रेसवे बनवण्यासाठी करण्यात आला आहे. त्यांनी 2027 पर्यंत संपूर्ण भारतातून कचरा पूर्णपणे संपवण्याच्या एका मोठ्या योजनेचा उल्लेख केला. जमा होणाऱ्या या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाईल आणि 'बायो-डाइजेस्टर' तंत्रज्ञानाचा वापर करून त्यापासून हायड्रोजन गॅसची निर्मिती केली जाईल, ज्यावर दिल्लीच्या बसेस धावतील.
(नक्की वाचा- Nashik News: नाशिकवरचे संकट टळले! पालघरमध्ये थैमान घालणारा 'पावसाचा भोवरा' गुजरातकडे सरकला)
टॉयलेटचे सांडपाणी विकून वार्षिक 325 कोटींची कमाई!
कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनामध्ये लपलेल्या अफाट आर्थिक संधींवर प्रकाश टाकताना गडकरींनी त्यांच्या स्वतःच्या नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या संसदीय क्षेत्रातील महानगरपालिका प्रक्रिया केलेले सांडपाणी म्हणजेच टॉयलेटचे गंदे पाणी शुद्ध करून उद्योगांना विकत आहे. या वेस्ट-वॉटरच्या विक्रीतून तिथली महानगरपालिका दरवर्षी तब्बल 325 कोटी रुपयांची घसघशीत कमाई करत आहे. त्यामुळे कचऱ्याला 'वेल्थ' म्हणजेच संपत्तीत बदलणे पूर्णपणे शक्य असून, दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे गडकरी म्हणाले.