नाशिककरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेला त्र्यंबकेश्वरमधील ढगफुटीचा आणि नाशिकमधील महाप्रलयाचा धोका तूर्तास टळला आहे. काल पालघरमध्ये तब्बल 450 मिमी इतका रेकॉर्डब्रेक पाऊस पाडणारा आणि त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे पुढे सरकण्याची दाट शक्यता असलेला 'पावसाचा तीव्र भोवरा' आता आपली दिशा बदलून पुढे निघून गेला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, हा तीव्र मान्सून भोवरा आता उत्तर दिशेला गुजरातमधील सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचे संकट टळले असले, तरी धोका पूर्णपणे संपलेला नाही.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Missing Link: प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी पुन्हा खुला)
परिस्थिती सध्या नियंत्रणात
हवामान तज्ज्ञांच्या मते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या दिशेने येणारा मुख्य पावसाचा चक्राकार प्रवाह सरकल्यामुळे नाशिकवरील सर्वात मोठे संकट टळले आहे. घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, एकूण परिस्थिती आपल्या दृष्टीने सध्या पूर्णपणे नियंत्रणात असून तुलनेने समाधानकारक राहिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहण्याची गरज आहे."
नाशिक शहरात रात्री अतिवृष्टी
नाशिक शहराला रात्री पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेल्या 12 तासांमध्ये नाशिक शहरात तब्बल 83 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या कोसळणाऱ्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून गोदावरी नदीच्या पातळीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.
(नक्की वाचा- US-Iran War: अमेरिका-इराण युद्ध संपले तरी तणाव कायम! हॉर्मुझच्या समुद्रात तेलवाहू टँकरवर हल्ला)
त्र्यंबकेश्वरच्या गल्ल्यांमध्ये पाणीच पाणी
दुसरीकडे, तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्र्यंबकेश्वर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर आणि गल्लीबोळांमध्ये वेगाने पाणी वाहू लागले आहे. अनेक गल्ल्यांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे स्थानिक नागरिक आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
नाशिकमधील धरणांचा पाणीसाठा वाढला
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा एकच दिवसात 7 टक्क्यांनी वाढला. जून महिना उलटून देखील नाशिकमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मुसळधार पावसाने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापुर धरण 67.74 टक्के भरले. सध्या गौतमी गोदावरी धरणातून पाण्याची विसर्ग केला जात आहे. नाशिक शहरात गेल्या 12 तासात अतिवृष्टी झाली असून 83 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world