बघता बघता 2025 वर्ष हे अर्धं सरलं असून, या वर्षाच्या उत्तरार्धाला जुलै महिन्यापासून सुरूवात झाली आहे. जुलै महिना हा सणवार, उत्सवांमुळे महत्त्वाचा असतो. जुलै महिन्यात आषाढी एकादशी आणि गुरु पौर्णिमा येत आहे. या महिन्याची सुरूवात म्हणजेच 1 तारीख एका विशिष्ट 'डे' पासून होते. 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे (Doctors Day 2025) साजरा केला जातो. हा दिवस कोणामुळे साजरा केला जातो, कशासाठी केला जातो ते पाहूयात.
( नक्की वाचा: वयाच्या चाळीशीत दिसाल 25 वर्षांचे; डॉक्टर म्हणतात, पाणी पिण्याच्या या 4 सवयी आताच बदला! )
पंतप्रधान मोदींनी दिल्या 'डॉक्टर्स डे' च्या निमित्ताने शुभेच्छा
1 जुलै रोजी डॉक्टरांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर्स डे (Doctors Day 2025) साजरा केला जातो. डॉक्टर हा देवासमान असतो आणि तो मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना खेचून आणण्याचे काम करत असतो. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून हे डॉक्टर रुग्णांना नवे जीवन देत असतात, त्यांना व्याधींपासून दूर ठेवत असतात. त्यांच्या याच कामाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय डॉक्टर दिन का साजरा केला जातो?
राष्ट्रीय डॉक्टर दिन भारताचे महान चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. रॉय यांच्याबाबतीत एक विचित्र योगायोग घडला होता. त्यांचा जन्मही 1 जुलै रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यूही 1 जुलै रोजीच झाला होता. डॉ. बिधान चंद्र रॉय हे केवळ एक उत्कृष्ट डॉक्टरच नव्हते, तर ते द्रष्टे राजकारणी आणि शिक्षणतज्ज्ञही होते.
( नक्की वाचा: कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा... )
पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम हे अत्यंत उल्लेखनीय होते. बंगालमध्ये त्यांनी 5 शहरे वसवली. दुर्गापूर, कल्याणी, बिधाननगर, अशोकनगर आणि हबरा अशी या शहरांची नावे आहेत. त्यांनी धर्मादाय रुग्णालयेही स्थापन केली जिथे गरीबांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळू लागले. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देऊन डॉ.रॉय यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.
डॉ. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला होता आणि त्यांचे निधन 1 जुलै 1962 रोजी झाले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान, रुग्णांप्रती करुणेचा भाव आणि आरोग्य सेवेमध्ये त्यांनी केलेले काम आणि दिलेले योगदान याचा गौरव करण्यासाठी 1991 सालापासून 1 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' म्हणून साजरा केला जातो.