
इस्रायल-इराणच्या युद्धात मोठ्ठी हानी झाली. त्यानंतर चीनमधल्या पुरात पाणीच पाणी झालं. जपान, इटली, हवाईमध्ये ज्वालामुखी फुटला. लॉस एँजेलिसमध्ये वणवा पेटला. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. अहमदाबादमध्ये विमानात बसलेल्यांवर काळाने घाला घातला. जगातल्या गेल्या काही दिवसांतल्या या महाभयंकर घटना घडल्या. जगभरातला हा विनाश पाहता, जगाची वाटचाल अंताकडे सुरू झालीय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जग या चिंतेत असताना जगाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. ते एका माशानं. एक मासा जो कधीच दिसत नाही, तो गेल्या वीस दिवसांत चार वेळा दिसला आहे. हा मासा दिसणं म्हणजे प्रलयाचे संकेत समजले जातात. आणि म्हणूनच जगाच्या विनाशाची भाकितं सुरू झाली आहेत. त्या माशाचं नाव आहे डुम्सडे मासा. तो किनाऱ्यावर आला आहे. त्यामुळे निसर्ग धोक्याचा इशारा देत आहे. त्यामुळे समुद्रकाठी तणाव ही वाढला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तामिळनाडूमधल्या समुद्रात हा प्रचंड महाकाय मासा सापडला आहे. मासेमारीसाठी कोळ्यांनी जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात हा मासा अडकला. या माशाला कोळ्यांनी जाळ्यातून ओढून बाहेर काढलं. मासा एवढा लांब की त्याला पकडायला सात जण लागले. चंदेरी रंगाचा चमचम करणारा हा मासा आहे. लाल रंगाची किनार आणि करड्या रंगाचे ठिपके. पाहताक्षणी एखादा सापच वाटावा असा हा मासा आहे. अत्यंत दुर्मिळ असा हा डुम्सडे मासा. हा मासा समुद्रात अत्यंत खोलवर असतो. त्यामुळे डुम्सडे मासा दिसणं अत्यंत दुर्मिळ समजलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मासा दिसणं म्हणजे धोक्याचा इशारा समजला जातो. मोठ्या नैसर्गिक संकटाची ती चाहूल असते, असं म्हटलं जातं. हा डुम्सडे मासा ओअरफिश नावानंही ओळखला जातो. रेगेलेकस ग्लेस्ने असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. सगळ्यात लांब हाडाचा मासा म्हणून त्याची ओळख आहे.
त्याची लांबी तब्बल अकरा फूट असते. हा मासा समुद्रापासून जवळपास तीन हजार फूट खोलवर राहातो. समुद्रात एवढ्या खोलवर प्रकाश अत्यंत कमी असतो. तापमान अति थंड असतं. इतक्या खोलवर राहात असलेला हा डुम्सडे मासा सहसा समुद्राच्या पृष्ठभागावर किंवा किनाऱ्यावर येत नाही. तामिळनाडूतल्या समुद्रात हा मासा सापडल्यावर आता जरा चिंतेत भर पडली आहे. कारण हा डुम्सडे मासा म्हणजे मोठ्या संकटाचा इशारा असल्याचं शतकानुशतकं सांगितलं जातं आहे. या माशाबद्दल अनेक लोककथा आहेत. डुम्सडे मासा दिसणं म्हणजे दुर्दैव, मृत्यू किंवा मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत समजले जातात. समुद्रात खाली देवदूत राहतात, आणि संकटावेळी हेच देवदूत या माशाला वरती पाठवून इशारा देतात, अशी जपानी मान्यता आहे. आशियामधल्या बऱ्याच भागांमध्येही डुम्सडे माशाबद्दल अशीच मान्यता आहे. हा मासा दिसल्यास भूकंप किंवा त्सुनामीचा इशारा समजला जातो. 2010 मध्ये जपानच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक डुम्सडे मासे मृत आढळले होते. हे मासे किनाऱ्यावर दिसल्यानंतर 2011 मध्ये जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामी आली होती. यामध्ये 15 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.
खोल समुद्रात पाण्याच्या मोठ्या प्रमाणात हालचाली वाढल्या तर मोठं नैसर्गिक संकट येऊ शकतं. म्हणूनच हे मासे वर येतात असं सांगितलं जातं. गेल्या 20 दिवसांत हा मासा चार वेळा दिसला आहे. भारतामध्ये एकदा, न्यूझीलंडमध्ये एकदा तर ऑस्ट्रेलियात दोन वेळा डुम्सडे माशाचं दर्शन झालं आहे. डुम्सडे माशाबद्दल सर्वात जास्त लोककथा या जपानमध्ये आहेत. योगायोग म्हणजे जपानमधली बाबा वेंगा समजली जाणारी रायो तात्सुकीनं 2021 साली लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये 2025 मध्ये मोठ्ठं नैसर्गिक संकट येणार असल्याचं भाकित केलं होतं.
जुलै 2025 मध्ये संकट येईल, अशी तिची भविष्यवाणी होती. आणि आता जूनमध्ये हा डुम्सडे मासा दिसला आहे. त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. अर्थात डुम्सडे मासा हा संकटाचा इशारा देतो, या लोककथा आहेत, ते विज्ञानाला मान्य नाही. त्या माशाला काही दुखापत किंवा आजार झाला, तर हा मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येऊ शकतो. समुद्रातल्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्यास किंवा हवामान बदल झाल्यास हा मासा वरती येतो,असं विज्ञान म्हणतं. प्राणी, पक्षी आणि समुद्रातले जीव हे निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचे संकेत देत असतात, अशी एक सर्वसाधारण मान्यता आहे. आणि त्याच मान्यतेमुळे या माशाचा संबंध संकटाशी जोडला गेला आहे. सध्या जगभरातली संकटं पाहता या माशानं टेन्शन प्रचंड वाढवलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world