भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी आता केवळ अत्याधुनिक उपकरणांचीच नव्हे, तर कुशल मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. याच मुद्द्याला अधोरेखित करत अदाणी युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी मानवी बुद्धिमत्ता आणि संशोधनावर भर देण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबाद येथे आयोजित चिप्स 2026 (CHIPS 2026) या राष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
उद्योग अन् शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याची गरज
अहमदाबाद येथील अदाणी युनिव्हर्सिटीत पार पडलेल्या या परिषदेत डॉ. प्रीती अदाणी यांनी मानवी बुद्धिमत्तेचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, आपल्या तंत्रज्ञानाची प्रगती ही केवळ मशीन किती हुशार बनतात यावर मोजली जाऊ शकत नाही. तर आपण मानवी बुद्धिमत्तेचा वापर किती चांगल्या पद्धतीने करतो यावर आपली खरी प्रगती अवलंबून असेल.
भारत सेमीकंडक्टर क्षेत्रात वेगाने पुढे जात असताना चिप डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग या तिन्ही क्षेत्रांमध्ये भारताला मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासणार आहे.

गुजरात ठरणार सेमीकंडक्टर क्षेत्राचे केंद्र
भारताच्या सेमीकंडक्टर मिशनमुळे या क्षेत्राला मोठी गती मिळाली आहे. विशेषतः गुजरातमधील धोलेरा आणि सानंद येथे सुरू असलेल्या भव्य प्रकल्पांमुळे गुजरात या क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.
याच पार्श्वभूमीवर अदाणी युनिव्हर्सिटी अहमदाबादमधील आपल्या नव्या भव्य ग्लोबल कॅम्पसमध्ये सेमीकंडक्टर डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगचे विशेष कोर्सेस सुरू करणार आहे. यामध्ये तरुण अभियंत्यांसाठी खास प्रोग्राम्स, कर्मचाऱ्यांसाठी एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन आणि प्राध्यापकांच्या विकासासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जागतिक कंपन्यांचा परिषदेत सहभाग
चिप्स 2026 या परिषदेत जगातील आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्यांचे दिग्गज एकत्र आले होते. क्वालकॉम, एनएक्सपी सेमीकंडक्टर्स, मायक्रॉन टेक्नॉलॉजी, सिनॉप्सिस, इन्फिनिऑन टेक्नॉलॉजीज आणि सिरिल अमरचंद मंगलदास यांसारख्या बलाढ्य संस्थांच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. या परिषदेत भारतातील सेमीकंडक्टर डिझायनिंगचे भविष्य, उत्पादन क्षेत्रातील संधी आणि या क्षेत्रातील रोजगाराचे नवे पर्याय या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या विशेष परिषदेचे आयोजन आयआयटी मंडी, व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडिया आणि सिरिल अमरचंद मंगलदास यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. गुजरात स्टेट इलेक्ट्रॉनिक्स मिशन आणि विविध शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत हजेरी लावली. शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजा यांची सांगड घालून भारतीय तरुणांना जागतिक दर्जाचे बनवणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world