
Earphones Warning : तुम्ही प्रवास करताना किंवा घरी असताना कानात बराच काळ हेडफोन्स किंवा इअरफोन्स घालून गाणी ऐकत असाल तर वेळीच इकडे लक्ष द्या. कारण 12 ते 35 वर्षं वयोगटातल्या 100 कोटींहून अधिक लोकांना बहिरेपण येऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं दिला आहे. नेमके काय आहेत इअरफोन्सचे दुष्परिणाम आणि WHO ने इअरफोन्सबद्दल कोणते गंभीर इशारे दिलेत. यावर सविस्तर घेतलेला आढावा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हेडफोन्स आणि इअरफोन्स कानात घालून तासन् तास गाणी ऐकत असाल, सिनेमा बघत असाल किंवा फोनवर बोलत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हेच हेडफोन्स आणि इअरफोन्स तुमची ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी करत आहेत. याबाबत WHO ने गंभीर इशारा दिला आहे. WHO ने केलेल्या एका अभ्यासानुसार, 12 ते 35 वर्षे वयोगटातल्या 100 कोटींहून अधिक लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा किंवा बहिरेपणाचा धोका आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इअरफोन्स आणि हेडफोन्सचा आवाज. जर आवाज खूप मोठा असेल किंवा दीर्घ काळासाठी हेडफोन्स वापरले तर ऐकण्याची क्षमता कमी होते. फोनमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कानांना आणि मेंदूलाही हानी पोहोचवतात. जेव्हा आपण हेडफोन्स दीर्घकाळासाठी लावतो, तेव्हा रेडिएशन्स कानातल्या संरचनेवर परिणाम करू शकतात.
हेडफोन्सचे दुष्परिणाम जाणवण्याआधी कोणती लक्षणं जाणवतात?
- हळू हळू कमी ऐकू येणं
- कानात सतत आवाज येणं
- किंवा शिट्टी वाजल्यासारखं वाटणं
- एका किंवा दोन्ही कानात वेदना किंवा जळजळ होणं
- फोनवर बोलताना स्पष्ट ऐकू न येणं
नक्की वाचा - Weather Update : 2025 वर्षात उष्णतेचा पारा चढणार, कोणत्या राज्यांमध्ये रेड अलर्ट? उष्णता वाढण्याचं नेमकं कारण काय?
याच हेडफोन्स आणि इअरफोन्ससंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही दोन महिन्यांपूर्वी सगळ्या राज्यांना सावध करणारं पत्र लिहिलं होतं. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेसच्या अतुल गोयल यांनी पत्रात म्हटलंय...
- वायर किंवा वायरलेन्स इअरफोन्स आणि हेडफोन्सचा दीर्घकाळ वापर घातक आहे....
- दिवसाला दोन तासांपेक्षा जास्त काळ हेडफोन्स वापरु नये
- जास्त काळ हेडफोन्स वापरायचे असतील तर मधून मधून ब्रेक घेणं आवश्यक आहे
- दीर्घ काळ हेडफोन्स वापरल्यानं बहिरेपण येण्याचा धोका असतो
- दीर्घ काळ हेडफोन्सचा वापर केल्यास वेगवेगळे आवाज ओळखण्याची क्षमताही कमी होते
- हेडफोन्सच्या वापरामुळे बहिरेपण आला तर कानांची ऐकण्याची क्षमता संपून जाते
- श्रवण यंत्राच्या वापरानंतरही ऐकू येणं शक्य होत नाही
- विशेषतः तरुणांमध्ये हेडफोन्सचा वापर वाढतोय, त्यामुळे तरुणांना जास्त धोका आहे
- तसंच लहान मुलांना ऑनलाईन गेमिंगपासून दूर ठेवा, असं आवाहनही करण्यात आलंय
- कॉल सेंटर्स, एडिटिंग, साऊंड इंजिनिअरिंग अशा क्षेत्रांमध्ये हेडफोन्सचा वापर जास्त काळासाठी केला जातो.
काय काळजी घ्याल?
- फोनवर बोलताना स्पीकर मोड किंवा एअरट्यूब हेडसेट वापरा
- इअरफोन्सपेक्षा हेडफोन्सचा वापर करा
- सलग एक तासापेक्षा जास्त काळ इअरफोन्स वापरु नका
- तासाभराच्या इअरफोनच्या वापरानंतर ब्रेक घ्या
- इअरफोन्सचा आवाज 60 टक्क्यांपेक्षा कमी ठेवा
नक्की वाचा - थेट ताव मारा...! APMC मध्ये हापूसची बंपर एन्ट्री; किंमत घसरल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
तरुणांमध्ये इअरफोन्सचा वापर वाढतोय...
जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी दिलेले हे इशारे आताच गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे इअरफोन्सच्या वापरामुळे बहिरेपण आला तर श्रवण यंत्राच्या वापरानंतरही ऐकू येणं शक्य नाही,
हा महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world