Ebola Virus 2026: युगांडा आणि काँगोसह अनेक आफ्रिकन देशांमध्ये इबोला व्हायरस संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. यादरम्यान युगांडाहून भारतात आलेल्या एका महिलेमध्ये इबोला व्हायरसची लक्षणे आढळली आहेत. खबरदारी म्हणून या महिलेला बंगळुरूतील शासकीय रुग्णालयात देखरेखीखाली क्वारंटाइन करण्यात आले आहे. पण ही महिला इबोला व्हायरसने संक्रमित आहे की नाही, यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तपासणीसाठी रक्ताचे नमुने पुण्याच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' (NIV) कडे पाठवण्यात आले आहेत, रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे.
भारतात इबोला व्हायरसची एण्ट्री?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडाहून प्रवास करून आलेल्या या महिलेला बंगळुरूच्या शासकीय रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या महिलेला किरकोळ स्वरुपात अंगदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. सध्या महिलेची प्रकृती सामान्य असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सरकारने स्पष्ट केले आहे की भारतात अद्याप इबोला व्हायरसये एकही प्रकरण समोर आलेले नाही.
घाबरून जाऊ नका, सरकारचे आवाहन
भारत सरकार इबोला व्हायरसच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारे मिळून देखरेख ठेवत असून आवश्यक आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. विमानतळ आणि इतर प्रवेशद्वारांवर (Entry Points) प्रवाशांचे स्क्रीनिंग आणि देखरेख सुरू आहे. सरकारने जनतेला न घाबरण्याचे आणि कोणत्याही अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. लोकांना केवळ सरकारी आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अनेक आफ्रिकन देशांमधील इबोलाचा उद्रेक लक्षात घेता, कर्नाटक आरोग्य विभागाने प्रभावित देशांचा प्रवास करून आलेल्या व्यक्तींना मायदेशी परतल्यानंतर 21 दिवसांपर्यंत स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा; तर दुसरीकडे क्विक रिस्पॉन्स टीम (RRT) देखरेखीचे काम करेल.
(नक्की वाचा : Nautapa 2026: नवतपाच्या 9 दिवसांत चुकूनही घालू नका 'हे' 3 रंगांचे कपडे, रीसर्चमधील धक्कादायक माहिती समोर)
बंगळुरूमधील 'राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसीजेस' (RGICD) ला आयसोलेशन सेंटर म्हणून निश्चित करण्यात आले आहे, तर महामारी रोग रुग्णालयाला क्वारंटाइन आणि उपचार केंद्र म्हणून घोषित केले आहे. मंगळुरूमधील 'न्यू मंगळुरू पोर्ट अथॉरिटी' (NMPA) अंतर्गत येणाऱ्या 'श्रीनिवास पोर्ट हॉस्पिटल'ला क्वारंटाइन सेंटर म्हणून निश्चित केले आहे, तर वेनॉक जिल्हा रुग्णालयाला आयसोलेशन आणि उपचार केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
(नक्की वाचा : Nautapa 2026: नवतपाच्या 9 दिवसांत 'या' एका भाजीपासून राहा लांब; नाहीतर आरोग्याबाबत पश्चाताप करावा लागेल!)
WHO ने केले सतर्क
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 17 मे रोजी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि युगांडामध्ये पसरत असलेल्या इबोला आजाराच्या (ED) प्रादुर्भावाला "आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी" (PHEIC) घोषित केले आहे. आफ्रिकन देशांमध्ये इबोला व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे काँगोमध्ये समोर येत आहेत. काँगोमध्ये आतापर्यंत इबोलाचे 101 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 900 हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत.