Emergency Alert: तुमच्या मोबाईलवर आलेल्या धडकी भरवणाऱ्या मेसेजचा अर्थ काय? सरकारची नवीन यंत्रणा समजून घ्या

तुमच्या मोबाईलवर अचानक येणारा 'इमर्जन्सी अलर्ट' घाबरवून टाकणारा नसून, तो नैसर्गिक आपत्ती काळात जीव वाचवण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केलेल्या 'सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीम'चा एक भाग आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

जर तुमच्या मोबाईलवर अचानक जोरात आवाज (Beep) होऊन 'इमर्जन्सी अलर्ट' (Emergency Alert) असा संदेश आला, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) द्वारे राबवल्या जाणाऱ्या एका विशेष चाचणीचा भाग आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत सावध करण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

काय आहे ही 'सेल ब्रॉडकास्टिंग' यंत्रणा?

सेल ब्रॉडकास्टिंग हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे सरकार एका ठराविक भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी आपत्कालीन संदेश पाठवू शकते. हे सामान्य SMS पेक्षा वेगळे आहे. सामान्य एसएमएस एका व्यक्तीला पाठवला जातो, तर हे अलर्ट 'ब्रॉडकास्ट मोड'मध्ये असतात, जे त्या क्षेत्रातील सर्व मोबाईल टॉवर्सशी कनेक्ट असलेल्या फोनवर त्वरित पोहोचतात.

Advertisement

(नक्की वाचा-  JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त)

ही यंत्रणा का महत्त्वाची आहे?

वेळेवर मिळालेली माहिती हजारो लोकांचे प्राण वाचवू शकते. ही यंत्रणा नैसर्गिक आपत्ती जसं की त्सुनामी, भूकंप, वीज पडणे किंवा चक्रीवादळ अशावेळी सर्वांना अलर्ट करेल. तसेच गॅस गळती किंवा रासायनिक दुर्घटना, अतिवृष्टी किंवा तीव्र उष्णतेची लाट अशावेळी नागरिकांना सावध कले.

यंत्रणा कशी कार्य करते?

ही यंत्रणा 'जिओ-टार्गेटिंग' (Geo-targeting) तंत्रज्ञानावर आधारित आहे. उदाहरणार्थ, जर गुजरातमधील एखाद्या भागात भूकंप झाला, तर त्या भागातील मोबाईल टॉवर्सच्या कक्षेत येणाऱ्या सर्व फोनवर हा अलर्ट आपोआप जाईल. यासाठी NDMA 'सचेत' (SACHET) या एकात्मिक प्रणालीचा वापर करते, जी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांचे पालन करते.

(नक्की वाचा-  Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, सैराटलाही टाकलं मागे)

स्वदेशी तंत्रज्ञान आणि भाषेची उपलब्धता

विशेष म्हणजे, ही संपूर्ण यंत्रणा भारताच्या 'सी-डॉट' (C-DOT) या संस्थेने स्वदेशी बनावटीने विकसित केली आहे. हे तंत्रज्ञान भारतातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यान्वित झाले आहे. नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत माहिती मिळावी, यासाठी ही यंत्रणा 19 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये संदेश पाठवू शकते.

चाचणी संदेशाचा अर्थ काय?

सध्या अनेक युजर्सना चाचणी (Test) संदेश पाठवले जात आहेत. या संदेशाचा उद्देश केवळ यंत्रणेची कार्यक्षमता तपासणे हा आहे. जर तुम्हाला असा संदेश मिळाला, तर त्यावर कोणतीही कृती करण्याची गरज नाही. हा संदेश केवळ सिस्टीम व्हॅलिडेशनचा एक भाग आहे.

Advertisement

Topics mentioned in this article