मनीष रक्षमवार, गडचिरोली
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलीस चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. कोंटा येथील भेज्जी भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. जवानांनी घटनास्थळावरून तीन स्वयंचलित शस्त्रांसह अनेक शस्त्रेही जप्त केली आहेत. पहाटेपासून संरक्षण दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. डीआरजीची टीम नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी बाहेर पडली होती.
नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनंतर 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. INSAS, AK-47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
सुकमा जिल्ह्याच्या कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीच्या नक्षलवादी सदस्यांच्या गुप्त माहितीवरून DRG आणि CRPF दल रवाना झाले होते. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस स्टेशन हद्दीतील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम, भंडारपदर या गावांच्या जंगल-टेकड्यांमध्ये डीआरजी टीम आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. शोधकार्यात आतापर्यंत एकूण 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.