अमेरिकेतील न्याय विभागाकडून उपस्थित करण्यात आलेल्या कायदेशीर अडथळ्यांना अदाणी समुहाचे संचालक गौतम अदाणी यांनी उत्तर दिलं. या प्रकारचे हल्ले समुहाला नवीन नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अदाणी ग्रीन एजन्सीला अमेरिकेतून अनेक आरोपांचा सामना करावा लागला हे तुमच्यापैकी अनेकांनी वाचले असेल. या प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्याची आमची ही पहिली वेळ नाही. या प्रकारचा प्रत्येक हल्ला अदाणी समुहाला मजबूत करत आहे, असं त्यांनी सांगितले. जयपूरमध्ये झालेल्या 51 व्या जेम अँड ज्वेलरी पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रकरणात गैरबुद्धीनं करण्यात आलेल्या असंख्य रिपोर्टींगनंतरही अदाणींच्या बाजूने कोणावरही एफसीपीएचे उल्लंघन केल्याचा किंवा न्यायात अडथळा आणण्याच्या कोणत्याही कटाचा आरोप करण्यात आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
गौतम अदाणी यांनी सांगितलं की, सध्याच्या जगात नकारात्मक गोष्टींचा सत्यापेक्षा अधिक वेगानं प्रसार होतो. आम्ही कायदेशीर मार्गानं काम करत आहोत. जागतिक स्तराच्या नियमनाचे अनुपालन करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.
( नक्की वाचा : 'आम्हाला अमेरिकेकडून कोणतीही सूचना नाही', अदाणी प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण )
अदाणी समुहाला यश मिळालं असलं तरी त्यांच्यासमोरील आव्हाने आणखी मोठी असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या आव्हानांनी आम्हाला कमकुवत केलेलं नाही. त्यांनी आमची नवी ओळख निर्माण केलीय. त्यांनी आम्हाला आणखी भक्कम केलंय. प्रत्येक पिछेहाटीनंतर आम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ हा विश्वास दिलाय.
तुमची स्वप्नं जितकी भव्य असतील जग तितकीच तुमची तपासणी करेल. अर्थात या तपासणीनंतरही नवी भरारी घेण्याचं धैर्य तुम्हाला दाखवावं लागेल. आजपर्यंत जिथं कुणीही पोहचले नाही त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करावा लागेल. सर्वात पुढं राहण्यासाठी तुम्हाला मर्यादा तोडाव्या लागतील तसंच स्वत:च्या व्हिजनवर विश्वास ठेवावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
धारावी फक्त प्रकल्प नाही
मुंबईतीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदाणी समुहाकडून होत आहे. गौतम अदाणी यांनी या भाषणात धारावी प्रकल्पाचाही उल्लेख केला. 'माझ्यासाठी धारावी हा फक्त झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकल्प नाही. तर, शाश्वत भविष्यासाठी घेतलेला निर्णय आहे. यामुळे लाखो लोकांना सन्मापूर्वक जगण्याची संधी मिळणार आहे.' असं त्यांनी यावेळी सांगितलं.