अदाणी समुहातील कंपनी अदाणी ग्रीन एनर्जीकडून अमेरिकेत लाचखोरीच्या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयानं मोठं वक्तव्य केलं आहे. या प्रकरणात अमेरिकेकडून भारत सरकारला कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी शुक्रवारी (29 नोव्हेंबर) साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
'हा खासगी फर्म, व्यक्ती आणि अमेरिकेच्या कायदा विभागाशी निगडीत एक कायदेशीर प्रकरण आहे. या प्रकरणात निश्चित कायदेशीर मार्ग आहेत. सर्व कायदेशीर बाबींचं यामध्ये पालन केलं जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. या प्रकरणात भारत सरकारला काहीही कळवण्यात आलेलं नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पुढं सांगितलं की, 'समन्स किंवा अटक वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही विदेशी सरकारकडून केलेली विनंती परस्पर कायदेशीर सहकार्याचा भाग असतो. ही विनंती गुणवत्तेच्या आधारावर तपासली जाते. दरम्यान, या प्रकरणात आम्हाला अमेरिकेकडून कोणतीही विनंती मिळालेली नाही.
यापूर्वी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप आणि त्याबाबतच्या बातम्या निराधार आहेत, असं अदाणी ग्रीन एनर्जीनं बुधवारी स्टॉक एक्सजेंजमधील फाईलिंगमध्ये सांगितलं होतं. अमेरिकन फेडरल करप्शन प्रॅक्टीस अॅक्टनुसाल लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. त्याचबरोबर अदाणी परिवारातील कोणत्याही सदस्यावर आरोप नाहीत, असं अदाणी समुहानं स्पष्ट केलं होतं.
( नक्की वाचा : लाचखोरीच्या आरोपानंतरही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा अदाणी समुहावर विश्वास )
टांझानियातल्या कंटेनर टर्मिनलच्या उभारणीसाठी टांझानियाच्या सरकारने अदाणी पोर्टसोबत झालेल्या करारात कोणताही बदल होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून अदाणी समुहाच्या समभागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अदाणी पॉवरच्या शेअर्समध्ये 7.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे अमेरिकन यंत्रणांने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांचे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी खंडन केलं असून लंडन स्टॉक एक्चेंज ग्रुपचे सीईओ डेव्हिड श्वीमर यांनीही अदाणी समुहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी उभारणी करताना कोणतीही अडचण येणार नसल्याचं मत नोंदवलंय. तसंच भारतातले इस्रायली राजदूत नोर गिलोन यांनीही अदाणी समुहाला पाठिंबा दिला आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world