नवी दिल्ली सोमवारी पहाटे जोरदार भूकंपाच्या धक्क्यानी हादरली. भूकंपाची तीव्रता 4 रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. भूकंपाचा केंद्र सुमारे 5 किमी खोलीवर होता. धौला कुआं येथे भूकंपाचे केंद्र होते, असे वृत्त आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गाझियाबादमधील उंच इमारतींमधील रहिवाशांना तर स्थलांतर करावे लागले. मागील काही वर्षात अनेकदा दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. मात्र यामागची कारणे काय आहेत जाणून घेऊया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भूकंप कसा होतो?
भूकंप ही एक नैसर्गिक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या हादरण्यामुळे उद्भवते. पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक टेक्टोनिक प्लेट्समध्ये विभागलेला आहे. या प्लेट्स संथ गतीने पुढे जात राहतात. या काळात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, घासतात किंवा एकमेकांखाली सरकतात तेव्हा तणाव निर्माण होतो. जेव्हा हा ताण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त होतो तेव्हा खडक तुटतात आणि भरपूर ऊर्जा बाहेर पडते, ज्यामुळे भूकंप होतो.
(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)
दिल्लीत वारंवर भूकंप का होतात?
भूगर्भशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, दिल्ली हिमालयाच्या जवळ आहे. हिमालयाच्या जवळ असल्याने, दिल्लीला 'भूकंपप्रवण क्षेत्र' मानले जाते. हिमालयाची निर्मिती भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे झाली, ज्यामुळे या प्रदेशात वारंवार भूकंप होतात. दिल्लीमध्ये अनेक फॉल्ट लाईन्स आहेत. जेव्हा या फॉल्ट लाईन्सवर ताण जमा होतो तेव्हा भूकंप होऊ शकतो. आज दिल्लीत झालेला भूकंप या फॉल्ट लाईन्समधील तणावामुळे असू शकतो. याशिवाय, दिल्लीची माती वाळूची आणि गाळाची आहे, जी भूकंपाच्या वेळी अस्थिर होऊ शकते आणि इमारतींचे नुकसान करू शकते. म्हणूनच असे म्हटले जाते की जर दिल्लीत तीव्र भूकंप झाला तर मोठे नुकसान होऊ शकते.
(नक्की वाचा- मुंबईत हॉटेलमधील जेवणातून रोटी गायब होणार? काय आहे कारण?)
दिल्ली का आहे धोकादायक?
भारत झोन 2, झोन 3, झोन 4 आणि झोन 5 अशा चार भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. यापैकी झोन 5 हे सर्वाधिक धोकादायक क्षेत्र आहे, जिथे मोठ्या भूकंपांचा धोका असतो. तर, झोन 2 हा सर्वात कमी धोकादायक मानला जातो. दिल्लीचा विचार केला तर ती झोन 4 मध्ये येते. याचा अर्थ असा की येथे भूकंपाचा धोका आहे. भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने, दिल्ली आणि त्याच्या आसपासचा परिसर सर्वात संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे. झोन 4 मध्ये येणाऱ्या भागात भूकंपाचा धोका जास्त असतो. म्हणूनच दिल्लीबद्दल असे म्हटले जाते की जर येथे उच्च तीव्रतेचा भूकंप झाला तर मोठे नुकसान होऊ शकते.