डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लोकांची छळवणूक केल्याच्या आणि त्यांच्याकडून कोट्यवधींची रक्कम उकळल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडायला लागल्या आहेत. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्यांना पकडणे पोलिसांना अवघड जात असून यामुळेच हे प्रकार वाढीस लागलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक प्रथितयश, उच्चशिक्षित लोकांनाही डिजिटल अरेस्ट करून लुटलं जात आहे. पोलीस, वकील, डॉक्टर, अभिनेते यांनाही झोलर लोकांनी सोडलेलं नाही. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुन अक्किनेनी याच्या घरातील एका व्यक्तीलाही अशाच पद्धतीने लुटण्यात आले. स्वत: नागार्जुन यानेच ही बाब सांगितली आहे. सहा महिन्यांपूर्वी माझ्या घरातील एका व्यक्तीलादोन दिवस डिजिटल अरेस्ट करून ठेवण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.
नक्की वाचा: 120 कोटींची मालकीण, करिश्मा कपूरकडे लेकीची फी भरायला पैसेच नाही, कोर्टाने झाप झाप झापलं
'नागार्जुन'चे कुटुंबीय 'डिजिटल अरेस्ट'मध्ये कसे गेले ?
पोलिसांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये नागार्जुन याने त्याच्या घरात घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली. त्याने म्हटले की, पोलिसांना जेव्हा याबाबत कळवण्यात आलं तेव्हा झोलर लोकं क्षणार्धात गायब झाले. सहा महिन्यांपूर्वी माझ्या घरातील एका व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. हे घोटाळेबाज आपला मागोवा काढत असतात आणि आपल्याला अडचणीत आणू शकेल अशी बाब शोधण्याचा प्रयत्न करत असतात. हैदराबादचे पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती, ज्याला नागार्जुनही उपस्थित होता. पोलिसांनी एम्मादी रवी नावाच्या आरोपीला अटक केली असून तो चित्रपटांच्या पायरसीचं रॅकेट चालवत होता. नागार्जुन याने पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक केले आहे. फक्त तेलुगू चित्रपटसृष्टीच नाही तर भारतातील चित्रपटसृष्टीला या कारवाईमुळे दिलासा मिळेल असा विश्वास नागार्जुन याने व्यक्त केला आहे. सोबतच नागार्जुन याने लोकांना गंडा घालणाऱ्या वेबसाईटपासून सावाध राहावे असा इशाराही दिला आहे.
नक्की वाचा: PVR चा फुल फॉर्म काय आहे? कधी विचारही केला नसेल
मुंबईतील अभिनेत्री डिजिटल अरेस्टमध्ये, 6.5 लाख रुपयांचा गंडा
मुंबईत राहणाऱ्या एका 26 वर्षीय अभिनेत्रीला ऑक्टोबर महिन्यात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली गंडवण्यात आले होते. दिल्ली पोलिसांचा अधिकारी असल्याचे भासवत तिला घाबरवण्यात आले होते. तिला डिजिटल अटक करून जवळपास सात तास डिजिटल कैदेत ठेवण्यात आले होते. या अभिनेत्रीकडून झोलर लोकांनी 6.5 लाख रुपयेही उकळल्याचे तिने पोलीस तक्रारीत म्हटले होते. या अभिनेत्रीने बंगाली मालिका आणि काही हिंदी शोमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहात ती मुंबईत राहायला आली होती. या अभिनेत्रीला एक फोन आला आणि तिला सांगण्यात आले की तिचा मोबाईल नंबर हा आर्थिक घोटाळ्यासाठी वापरण्यात आला असून तिचा नंबर लवकरच बंद करण्यात येणार आहे. थोडावेळाने या अभिनेत्रीला पोलिसांच्या वेषातील दुसऱ्या एका व्यक्तीने फोन केला. आपण दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाचे अधिकारी असल्याची त्याने बतावणी केली होती. तू आर्थिक घोटाळ्यात सामील असून आम्ही सांगू तसे केले नाही तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी या अभिनेत्रीला देण्यात आली होती. ओळख पटवण्याच्या नावाखाली आणि निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी या महिलेकडून 6.5 लाख रुपये मागण्यात आले होते. हे पैसे मिळाल्यानंतर घोटाळेबाज गायब झाले.