टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघ आधीच नेट रन-रेटच्या पेचात अडकलेला असताना, आता संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा आक्रमक डावखुरा फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) अचानक संघ सोडून आपल्या मूळ गावी अलीगडला रवाना झाला आहे. कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते.
कर्करोगग्रस्त वडिलांची तब्येत बिघडली
बीसीसीआय (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू सिंहचे वडील खानचंद्र सिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना यकृत कर्करोग (Liver Cancer) असल्याचे निदान झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही बातमी मिळताच रिंकूने तातडीने घरी परतण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सराव सत्रातही तो सहभागी झाला नव्हता.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026: 'विंडिज'च्या विजयामुळे पाँईंटटेबलमध्ये उलटफेर! भारत टेंशनमध्ये; सेमीफायनलची समीकरणे बदलली)
झिम्बाब्वेविरुद्धच्या 'मस्ट-विन' सामन्यात खेळण्यावर साशंकता
गुरुवारी भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे. मात्र, या 'मस्ट-विन' सामन्यात रिंकू सिंह उपलब्ध असेल की नाही, याबाबत मोठी साशंकता आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा केली नसली तरी, रिंकूच्या अनुपस्थितीमुळे मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रिंकूच्या खराब फॉर्ममुळे टीकेची झोड
रिंकू सिंह यंदाच्या विश्वचषकात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. पाच सामन्यांमध्ये त्याने केवळ 8.00 च्या सरासरीने 24 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवात तो शून्यावर बाद झाला होता, तर त्याआधीच्या सामन्यांमध्येही त्याची बॅट शांतच होती.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026 Semifinal Scenarios: टीम इंडिया सेमीफायनल गाठणार की नाही? ही आहेत 2 समीकरणे)
विश्वचषकातील रिंकूची कामगिरी
- पाकिस्तान: 11 धावा
- नामीबिया: 1 धाव
- अमेरिका: 6 धावा
- नेदरलँड्स: 6 धावा
- दक्षिण आफ्रिका: 0 धावा
रिंकूची जागा कोण घेणार?
आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर रिंकू उपलब्ध नसेल, तर फिनिशरची भूमिका कोण बजावणार? संघ व्यवस्थापनासमोर रिंकूचा 'लाईक-टू-लाईक' पर्याय शोधण्याचे मोठे आव्हान आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world