FIR Against AAP : आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज आमदार संजीव झा आणि आदिल अहमद खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 17 आणि 18 डिसेंबर रोजी 'आप'च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका वकिलाने दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
काय आहे वादाचे कारण?
कनॉट प्लेस येथे सादर करण्यात आलेल्या एका नाटिकेचा व्हिडिओ 'आप'ने शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, सांताक्लॉजचा पेहराव केलेली व्यक्ती रस्त्यावर कोसळताना दाखवण्यात आली आहे. त्या व्यक्तीवर 'सीपीआर' उपचार करण्याचा देखावा करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मते, सेंट निकोलस आणि ख्रिसमसच्या पवित्रतेचा हा "थेट अपमान" असून राजकीय संदेश देण्यासाठी सांताक्लॉजचा वापर एका 'प्रॉप'सारखा करण्यात आला आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी याला "धार्मिक श्रद्धेची क्रूर थट्टा" म्हटले आहे. जबाबदार लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे वागणे शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली. सौरभ भारद्वाज यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "या नाटिकेद्वारे दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. भाजप आता ख्रिश्चनांचा मुखवटा घालून विरोधकांना घाबरवण्याचे राजकारण करत आहे," असे भारद्वाज म्हणाले. तसेच, लाजपत नगरमध्ये जेव्हा सांताक्लॉजच्या टोप्या खेचल्या गेल्या, तेव्हा भाजपच्या भावना का दुखावल्या नाहीत? असा सवालही त्यांनी विचारला.
कायदेशीर कारवाई
भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 299 (धार्मिक भावना दुखावणे), 302 आणि 3(5) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने पुरावा म्हणून 'आप'चे इंस्टाग्राम आणि फेसबुक लिंक पोलिसांना दिले आहेत.