Dr. Manmohan Singh Death: भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्य निधनानंतर देशभरात शोकव्यक्त केला जात असून देशाने एक सुसंस्कृत नेता, भारताला आर्थिक अडचणीतून बाहेर काढणारा अर्थमंत्री हरपला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मनमोहन सिंग यांनी नम्र भावनेतून सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ बनले. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो, असं म्हणत शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी अफाट बुद्धी आणि सचोटीच्या जोरावर भारताचे नेतृत्व केले. त्यांची अर्थशास्त्राबद्दल असलेली सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी एक गुरु आणि उत्तम मार्गदर्शक गमावला, अशा शब्दात काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
नक्की वाचा : (भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन )
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे.
आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील.
अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, असं ते म्हणालेत.