बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड अनमोल बिश्नोईला अटक; अमेरिकेत मुसक्या आवळल्या

अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. त्याला अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधून भारत सरकारने ताब्यात घेतल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात रडारवर असलेल्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. त्याला अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधून भारत सरकारने ताब्यात घेतल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला सोमवारी (18 नोव्हेंबर 2024) भारतीय वेळेनुसार कॅलिफोर्निया, यूएसए येथे ताब्यात घेण्यात आले. गेल्या महिन्यात भारत सरकारने अजामीनपात्र कलमांतर्गत वॉरंट जारी केले होते.  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनंतर ही कारवाई झाली आहे. अनमोल बिश्नोई हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी खून प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी आहे.

नक्की वाचा:'...तर मी उद्या अर्ज मागे घेणार', सांगता सभेतून दिलीप वळसेंचे मोठं चॅलेंज

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोलला भारतात आणण्याच्या प्रयत्नांचा परिणामही दिसू लागला आहे. अनमोलविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांसंदर्भात ही कारवाई करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनमोल बिश्नोईविरुद्ध नोंदवलेल्या दोन गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याच्यावर 18 अन्य गुन्हेही नोंदवले आहेत. नुकतेच एनआयएने अनमोलला अटक करण्यात मदत करणाऱ्याची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यान, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलचा मुंबई पोलिसांच्या वाँटेड यादीत समावेश आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (MCOCA) संबंधित खटल्यांसाठीच्या विशेष न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी अनमोल बिश्नोईच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यानंतर अमेरिकेने अनमोल त्यांच्या देशात आहे, असे सांगितले होते. 

Advertisement

नक्की वाचा: 'सगळ्यात मोठा जोकर, सोंग्या, भोंग्या...', CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार