Gautam Adani AI Centre of Excellence in Baramati inauguration : अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी आज २८ डिसेंबर, रविवारी पुणे जिल्ह्यातील बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं (AI) उद्घाटन केलं. विद्या प्रतिष्ठानअंतर्गत या अत्याधुनिक AI सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. विद्या प्रतिष्ठान ही पवार कुटुंबाकडून चालवली जाणारी शैक्षणिक संस्था आहे.
या कार्यक्रमात शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांची पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. याशिवाय NCP चे (SP) आमदार रोहित पवार आणि विद्या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष युगेंद्र पवारही उपस्थित होते.
गौतम अदाणी यापूर्वी २०२२ मध्ये बारामतीत आले होते. त्यावेळी अदाणी यांनी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचं उद्घाटन केलं होतं. अदाणी आणि पवार कुटुंबात दोन दशकांहून जुने संबंध आहेत. हे नवा एआय सेंटर ऑफ एक्सिलन्स क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित शिक्षण, कौशल्य विकास वाढविण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आलं आहे.
शरद पवार माझे मार्गदर्शक - गौतम अदाणी
AI सेंटर ऑफ एक्सिलन्स कार्यक्रमावेळी गौतम अदाणी यांनी संबोधित केलं. ते म्हणाले, शरद पवार नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत. बारामतीत सुरू करण्यात आलेलं AI केंद्र कृषी, स्वास्थ, नावीन्यपूर्ण याकडे लक्ष केंद्रीत करेल. आता AI भारताचा चौथा पाया बनणार आहे. AI भारताच्या विकास पथालाही आकार देईल असंही ते म्हणाले. एआयमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. जागतिक AI च्या स्पर्धेत भारताने एक पाऊल पुढे टाकलं आहे. AI केवळ एक तांत्रिक बाजू राहिलेली नाही तर जागतिक वर्चस्वासाठीची स्पर्धा बनली आहे.