अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी (Gautam Adani) यांचे कनिष्ठ चिरंजीव जीत अदाणी (Jeet Adani) यांचा विवाह दिवा शाह (Diva Shah) यांच्याशी शुक्रवारी (7 फेब्रुवारी 2025) साधेपद्धतीनं पार पडला. जीत अदाणी यांच्या विवाहानिमित्ताने अदाणी यांनी 10 हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी जाहीर केले आहे. हा विवाहसमारंभ अत्यंत छोट्या आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.
जीत अदाणी आणि दिवा शाह यांच्या विवाहसोहळ्यातील एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी विवाहसोहळ्यादरम्यान सुपुत्र जीत अदाणी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जीत यांची आई प्रीती अदाणी यांचं मुलाविषयी असलेले प्रेम आणि समर्पणाची आठवण करून दिली. यावेळी ते म्हणाले; जीत, तुझी आई तुझ्या पाठिशी कायम खंबीरपणानं उभी राहिली.
आज तू तुझ्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करत आहेस. मात्र एक गोष्ट तुला सांगाविशी वाटते की, तू घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे तुझ्या आईचं मार्गदर्शन, प्रेम, प्रार्थना आणि त्याग आहे. आई केवळ जन्मच देत नाही तर मुलांचे स्वप्न साकारण्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करते. आई तुझ्या पाठिशी कायम खंबीरपणे उभी राहिली. तुला योग्य मार्गावर नेणारी ती तुझी मार्गदर्शक राहिली आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाच्या काळात ती तुझ्या सोबत होती.
नक्की वाचा - गौतम अदाणी यांची मुलाच्या विवाहानिमित्त आदर्श कृती, सामाजिक कामांसाठी 10 हजार कोटींची मदत
गौतम अदाणींनी जीत अदाणींना शुभेच्छा देताना आणखी एका महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून दिली. ते म्हणाले, या क्षणाला आणखी खास बनवणारं काय आहे तर जीत आणि दिवा यांनी परंपरा स्वीकारुन आणि एक खास उद्देशाचा सन्मान करून स्वतःचा विवाह सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. कारण हे लग्न म्हणजे केवळ आनंदाचे क्षण नाहीत तर असंख्य वंचित व्यक्तींचं जीवन चांगल्या पद्धतीने घडवणाऱ्या अनेक उपक्रमांचे प्रतीक देखील असेल. मी प्रार्थना करतो की, जीत आणि दिवा यांच्यातील प्रेम उदारता, जबाबदारी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या इच्छेमध्ये कायम रुजलेले असावे.