Thermos Bottles: सावधान! 3 जणांची दृष्टी गेली, अनेक जण जखमी; 'थर्मॉस'च्या लाखो बॉटल्स आणि जारमध्ये गंभीर दोष

प्रसिद्ध 'थर्मॉस' (Thermos) कंपनीने सुरक्षिततेच्या कारणास्तव जगभरातून सुमारे 82 लाख फूड जार आणि बॉटल्स परत मागवल्या आहेत. या उत्पादनांच्या झाकणामध्ये तांत्रिक दोष असल्याने ते उघडताना वेगाने उडून गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

तुमच्याकडे 'थर्मॉस' (Thermos) ब्रँडचा फूड जार किंवा पाण्याची बाटली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेच्या ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाने (US Consumer Product Safety Commission) दिलेल्या सूचनेनुसार, कंपनीने आपल्या लोकप्रिय उत्पादनांमध्ये सुरक्षिततेचा गंभीर दोष आढळल्याने 82  लाख युनिट्स बाजारातून परत मागवले आहेत.

काय आहे नेमका धोका?

या उत्पादनांच्या 'स्टॉपर' म्हणजेच झाकणाच्या यंत्रणेत मोठी त्रुटी आढळली आहे. गरम पदार्थ साठवल्यावर कंटेनरमध्ये दाब कमी करण्याची यंत्रणा नसल्याने आत प्रचंड प्रेशर तयार होते. जेव्हा ग्राहक हे जार उघडतात, तेव्हा हे झाकण दाबाने बंदुकीच्या गोळीसारखे वेगाने बाहेर उडून ग्राहकाला धडकते. आतापर्यंत 27 तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत, तर 3 जणांना आपली दृष्टी कायमची गमवावी लागली आहे.

Advertisement

कोणती उत्पादने खराब?

माध्यमांतील वृत्तांनुसार, ही परत मागवण्याची प्रक्रिया विशेषतः जुलै 2023 पूर्वी उत्पादित केलेल्या स्टेनलेस किंग फूड जार्स (मॉडेल SK3000 आणि SK3020) तसेच सर्व स्पोर्ट्समन फूड अँड बेव्हरेज बॉटल्स (मॉडेल SK3010) वर लागू होते. या वस्तू विविध रंगांमध्ये विकल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या बाहेरील बाजूस ब्रँडचे नाव छापलेले असते, तर मॉडेलचा तपशील सामान्यतः तळाशी नमूद केलेला असतो.

ही उत्पादने अमेझॉन (Amazon), वॉलमार्ट (Walmart) आणि टार्गेट (Target) सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून जगभरात विकली गेली आहेत.

(नक्की वाचा-  Toll Plaza News: मुंबईच्या वेशीवरील 'हा' टोल नाका पुन्हा सुरु होणार? वाहनांकडून होणार वसुली)

ग्राहकांसाठी महत्वाची सूचना

  • तुमच्याकडे असलेल्या थर्मोसच्या तळाशी दिलेला मॉडेल नंबर तपासा.
  • जर तुमचे उत्पादन वरील यादीत असेल, तर त्याचा वापर त्वरीत थांबवा.
  • कंपनी अशा ग्राहकांना नवीन सुरक्षित स्टॉपर किंवा संपूर्ण उत्पादन बदलून देणार आहे.
  • अधिक माहितीसाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला (support.thermos.com) भेट देऊ शकतात.
     
Topics mentioned in this article