Kharegaon Toll Naka: मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंता वाढवणारी बातमी आहे. माजीवाडा-वडपे या मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) पूर्ण होत आले आहे. त्यामुळे गेल्या 9 वर्षांपासून बंद असलेला खारेगाव येथील टोल नाका येत्या काही महिन्यांत पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
भिवंडी बायपास महामार्ग सुधारणेचा भाग म्हणून 1998 मध्ये या टोलची सुरुवात झाली होती. मात्र, 2017 मध्ये हा टोल बंद करण्यात आला होता. आता MSRDC द्वारे हा महामार्ग 4 पदरी वरून थेट 12 पदरी केला जात आहे. हा मार्ग मुंबईला नाशिकशी जोडण्यासोबतच आमणे येथील समृद्धी महामार्गालाही जोडला जातो. कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी येथील प्रवासी तसेच मालवाहू वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत कळीचा आहे.
30 नवीन टोल बूथची उभारणी
NHAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, "रस्ता रुंदीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली सुरू केली जाऊ शकते. खारेगाव येथे सुमारे 30 टोल बूथ बांधण्याचे काम लवकरच पूर्ण होईल."
राजकीय पक्षांचा आक्रमक पवित्रा
टोल पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पक्षांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. "रस्ते कर भरणाऱ्या नागरिकांवर टोलचा अतिरिक्त बोजा टाकणे चुकीचे आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढतील. जर स्थानिकांना टोलमधून सवलत दिली नाही, तर आम्ही टोल नाका बंद पाडू," असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोणाला मिळणार दिलासा?
NHAI अधिकाऱ्यांच्या मते, अंतिम निर्णय मंत्रालय स्तरावर घेतला जाईल. मात्र, ज्या खाजगी वाहनांचा नोंदणीकृत पत्ता टोल नाक्यापासून 20 किमीच्या परिघात आहे, त्यांना टोलमधून सूट मिळण्याची शक्यता आहे. परंतु, ट्रॅव्हल्स, टुरिस्ट बसेस, टॅक्सी आणि मालवाहू वाहनांना टोल भरावा लागण्याची दाट शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world