Gold Prices Outlook: देशांतर्गत सराफा बाजार आणि MCX साठी मार्चचा सरलेला आठवडा प्रचंड अस्थिरतेचा ठरला. एकीकडे मध्य पूर्वेतील युद्धामुळे गुंतवणूकदार धास्तावलेले दिसले, तर दुसरीकडे सोन्याच्या किमतींनी अपेक्षेच्या उलट मोठी घसरण नोंदवली. बाजारामध्ये सोन्याच्या विक्रीचा ओघ सतत पाहायला मिळाला. गेल्या पाच दिवसांतील बाजारपेठेचा सविस्तर आढावा जाणून घेऊया...
MCXनुसार सोन्याचे रिपोर्ट कार्ड
मागील व्यापारी आठवड्याची सुरुवात सोन्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. 23 मार्च रोजी बाजार उघडताच सोन्यात मोठी विक्री दिसून आली. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.40 लाख रुपयांच्या स्तरावर उघडला, जो मागील बंद भावापेक्षा सुमारे 3 टक्के कमी होता. दिवसाअखेर ही घसरण अधिक वाढली आणि भाव 1,37,377 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर मंगळवार ते गुरुवारदरम्यान बाजारात मोठी अस्थिरता राहिली. जागतिक तणावामुळे किमती 1,39,000 रुपये ते 1,41,000 रुपयांदरम्यान फिरत राहिल्या.
27 मार्च म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने थोडी सावरण्याची चिन्हे दाखवली. खालच्या स्तरावर झालेली खरेदी आणि डॉलरमधील किरकोळ घसरणीमुळे सोन्याचे दर 1,40,287 रुपयांपर्यंत पोहोचले होते. पण ही रिकव्हरी होऊनही संपूर्ण आठवडा तोट्याचाच ठरला.
(नक्की वाचा: Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून बदलणार इनकम टॅक्सचे गणित, Old Or New Tax Regime; तुमच्यासाठी काय ठरेल फायदेशीर?)
इस्रायल-इराण युद्धादरम्यानही सोन्याचे दर का घसरत आहेत?
- सामान्यतः युद्ध किंवा भू-राजकीय तणावाच्या काळात सोने हे 'सेफ हेवन' (सुरक्षित गुंतवणूक) मानले जाते आणि त्याच्या किमती वाढतात. पण यावेळेस चित्र थोडे वेगळे आहे. डॉलरची मजबूती, व्याजदर कपातीची धूसर शक्यता आणि गुंतवणूकदारांचा रोख रकमेकडे कल, यामुळे किमती घसरताना दिसत आहेत.
- डॉलरची मजबूती: युद्धाच्या काळात गुंतवणूकदार डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, ज्यामुळे डॉलर इंडेक्स वधारला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोने महाग होते, परिणामी मागणी घटते आणि किमती पडतात.
- व्याजदरांचे गणित: जगभरातील बाजारांना अशी अपेक्षा होती की वर्ष 2026 मध्ये 'फेडरल रिझर्व्ह' व्याजदरात कपात करेल. पण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींनी महागाईची भीती निर्माण केली आहे. आता व्याजदर दीर्घकाळ चढेच राहतील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे, ज्यामुळे बिनव्याजी सोन्याची चमक फिकी पडत आहे.
- नफा वसुली (Profit Booking): युद्धाच्या काळात अनेक मोठे गुंतवणूकदार इतरत्र होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सोन्याची विक्री करून नफा वसूल करतात, जेणेकरून त्यांच्याकडे रोख रक्कम उपलब्ध राहील.
(नक्की वाचा: नोकरदारांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार सॅलरी स्ट्रक्चर; पगारावर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर)
Photo Credit: NDTV Marathi
आता सोन्यात गुंतवणूक करावी का?तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील ही घसरण गुंतवणुकीची एक सुवर्ण संधी असू शकते. गोल्डमन सॅक्स आणि कोटक सिक्युरिटीज यासारख्या संस्थांचा असा अंदाज आहे की, वर्ष 2026 च्या अखेरीस सोने 1.75 लाख ते 1.80 लाख रुपयांच्या पातळीला स्पर्श करू शकते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पोर्टफोलिओ बनवण्याची ही उत्तम वेळ आहे. बाजारातील अस्थिरता पाहता, एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी प्रत्येक घसरणीवर टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.