Google Maps: गूगल मॅप गाडीने प्रवास करताना खूप उपयुक्त ठरतो. गुगल मॅपच्या विश्वासावर लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. हायस्पीड इंटरनेटच्या सुविधेमुळे जगभरातील लोक गुगल मॅपच्या आधाराने दुर्गम ठिकाणांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र, गुगल मॅपवर पूर्णत: अवलंबून राहणे धोकादायक ठरु शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील फरेंदा पोलीस स्टेशन परिसरात घडला आहे. गुगल मॅपमुळे एक कार अपूर्ण बांधकाम झालेल्या एका फ्लायओव्हरवर पोहोचली. ज्यामुळे ती कार फ्लायओव्हरवर अर्ध्यावर लटकली. सुदैवाने, कारमधील सर्वजण सुरक्षित राहिले.
महाराजगंज जिल्ह्यातील गोरखपूर-सोनौली राष्ट्रीय महामार्गावरील भैया फरेंदा येथे बांधकाम सुरू असलेल्या एका फ्लायओव्हरवर हा प्रकार घडला. बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हरचा रूट डायव्हर्जन व्यवस्थेत निष्काळजीपणा आणि गुगल मॅपच्या चुकीच्या दिशानिर्देशांमुळे कार चालक थेट अपूर्ण फ्लायओव्हरवर चढला.
कार फ्लायओव्हरवर चढली, पण फ्लायओव्हरचे काम अपूर्ण होते. यामुळे कार अर्ध्यावर लटकली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी फ्लायओव्हरचं बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि क्रेनच्या साहाय्याने कार खाली उतरवली.
स्थानिक लोकांनी याबाबत काय सांगितले?
गुगल मॅपमुळे हा अपघात झाल्याचे ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता बदलण्यासाठी सूचक फलक लावण्याची मागणी केली आहे. तसेच, लोकांनी असेही सांगितले की, फक्त गुगल मॅपच्या भरोशावर रस्त्यांवर वेगाने गाडी चालवणे धोकादायक ठरू शकते.