नवीन 'ऑनलाइन गेमिंग बिल 2025' नुसार, Zupee या लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मने पैसे जिंकता येणारे ऑनलाइन गेम्स बंद करण्याची घोषणा केली आहे. ड्रीम11 आणि एमपीएलनेही असाच निर्णय घेतला आहे. मात्र, 'झुपी' पूर्णपणे सुरू राहणार असून, खेळाडू लुडो आणि साप-शिडी यांसारखे लोकप्रिय खेळ खेळू शकतील. झुपीने या गेम्सद्वारे मोठे नाव कमावले होते आणि सलमान खान, सैफ अली खान आणि कपिल शर्मा यांसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींना ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घेतले होते.
(नक्की वाचा- मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरचा अतिवापर मेंदूवर कसा परिणाम करतो? धोका टाळण्यासाठीचे उपाय काय?)
'प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025' हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित झाले आहे. या विधेयकानुसार, पैसे जिंकता येणारे ऑनलाइन गेम्स आता बंद करण्यात येणार आहेत. झुपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "नवीन बिल 2025 नुसार, आम्ही पैसे जिंकता येणारे गेम्स बंद करत आहोत, पण लुडो सुप्रीम, लुडो टर्बो, स्नेक्स अँड लॅडर्स आणि ट्रम्प कार्ड मेनिया यांसारखे आमचे लोकप्रिय फ्री गेम्स सर्व यूजर्ससाठी विनामूल्य उपलब्ध असतील. आम्ही भारतातील आमच्या 15 कोटी यूजर्सना मनोरंजक आणि जबाबदार गेमिंग अनुभव विनामूल्य देत राहू."
झुपीच्या आधी 'ड्रीम11' आणि 'एमपीएल'सारख्या इतर प्रमुख गेमिंग कंपन्यांनीही त्यांच्या ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ड्रीम11 ने 20 ऑगस्ट रोजी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या 'टाउन हॉल'मध्ये हा निर्णय कळवला, तर एमपीएलने 21 ऑगस्ट रोजी एका निवेदनात याची घोषणा केली.
(नक्की वाचा- खिशातील नोटांमुळे टीबीसारख्या अनेक गंभीर आजाराचा धोका; रीसर्चमधून धक्कादायक माहिती उघड)
नवीन ऑनलाइन गेमिंग बिलाचा उद्देश
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत विधेयक सादर करताना सांगितले की, ऑनलाइन मनी गेम्स समाजात, विशेषतः मध्यमवर्गीय तरुणांमध्ये एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे व्यसन लागते आणि कुटुंबाची बचत त्यात खर्च होते. सुमारे 45 कोटी लोक यामुळे प्रभावित झाले असून, 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमावली आहे, असा अंदाज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला ‘गेमिंग डिसऑर्डर' घोषित केले आहे," असेही त्यांनी सांगितले.