लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होण्यास काही दिवसांचाच कालावधी उरलाय. त्यावेळी उत्तर भारतातील हरियाणा या भाजपा शासीत राज्यात राजकीय भूकंप झालाय. राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. हरियाणात ऑक्टोबर 2019 पासून भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष या युतीचं सरकार होतं. लोकसभेच्या जागावाटपावरुन ही युती तुटली. त्यानंतर वेगानं घडलेल्या राजकीय घडामोडीत खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांना सोपवलाय. आज (मंगळवार) दुपारी भारतीय जनता पक्षांच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आलीय. त्यामध्ये नव्या मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित करण्यात येईल.
का तुटली युती?
हरियणामध्ये लोकसभेच्या 10 जागा आहेत. जननायक पक्षानं यामधील काही जागा देण्याची मागणी भाजपाकडं केली होती. 2 जागांसाठी हा पक्ष आग्रही होता. पण, सर्व 10 जागा लढवण्यावर भारतीय जनता पक्ष ठाम होता. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील युती तुटली आहे. ही युती तुटल्यानंतर भाजपा आणि जननायक पक्षाचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी स्वबळावर आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं हरियाणात निर्भेळ यश मिळवत सर्व 10 जागा जिंकल्या होत्या
विधानसभेतील संख्याबळ काय?
हरियणा विधानसभेत एकूण 90 आमदार आहेत. बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी 46 आमदारांची आवश्यकता आहे. भाजपाला बहुमतापेक्षा 6 कमी म्हणजेच 40 जागा मिळाल्या होत्या. 10 आमदारांच्या जनजानयक पक्षानं पाठिंबा दिल्यानंतर भाजपाचे मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री तर जजपचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले.
सध्या भाजपाचे 41 आमदार असून त्यांना 6 अपक्ष तसंच हरयाणा लोकहित पक्षाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपाकडं बहुमत सिद्ध करण्यासाठी 48 आमदारांचं बळ आहे. त्याचबरोबर जजप पक्षाचे पाच ते आमदारही भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती 'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिली आहे. हरियाणा विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राबरोबरच ऑक्टोबर 2024 मध्ये होणं अपेक्षित आहे.
खट्टर लोकसभा निवडणूक लढणार?
दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. कर्नाल मतदारसंघातून खट्टर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तिथं भाजपाचे संजय भाटीया सध्या खासदार आहेत.