काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकार सज्ज, गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये

घुसखोरीचे सर्व मार्ग सील करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. ज्याद्वारे पाकिस्तानातून दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित केल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक देखील अमित शाह यांनी यावेळी केले.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जम्मू काश्मीरमधील दहशतवादाच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक घेतली. सुरक्षा दलांना जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा खात्मा करण्याचे आणि आगामी अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश अमित शाह यांनी यावेळी दिले.

केंद्रीय मंत्री शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नवी दिल्लीत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक झाली. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, NSA अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, आयबीचे संचालक तपन डेका, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अटल दुल्लू, सीआरपीएफ डीजी बैठकीत सहभागी झाले होते. 

अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचीही माहिती घेतली. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी महामार्ग, संवेदनशील संस्था आणि संवेदनशील ठिकाणांवर दिवसरात्र देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांवर कारवाई करण्यासाठी सर्व प्रकारची संसाधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिलं.

घुसखोरीचे सर्व मार्ग सील करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. ज्याद्वारे पाकिस्तानातून दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित केल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक देखील अमित शाह यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशीच बैठक याआधी घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. 

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये 4 दहशतवादी हल्ले

जम्मू-काश्मीरच्या रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत दहशतवाद्यांनी चार ठिकाणी हल्ले केले, ज्यात नऊ यात्रेकरू आणि एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. तर सात सुरक्षा कर्मचारी आणि अनेक जण जखमी झाले. कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले आहे.