सर्व काही अचानक घडले. अगदी अनपेक्षित.... कुणालाही याचा अंदाज नव्हता. आणि ती बातमी आली, ज्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा झाली. शनिवारी (11 मे) संध्याकाळी नाट्यमय अंदाजात याची घोषणा झाली. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला तणाव निवळण्यास सुरुवात झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन्ही देशांनी शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून एकमेकांवर हल्ले आणि प्रत्युत्तर न देण्यावर सहमती दाखवली. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की दोन्ही देश आपापसात बोलणी केल्यानंतर यावर एकमत झाले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले की पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकांनी (डीजीएमओ) सायंकाळी 3 वाजून 35 मिनिटांनी भारतीय डीजीएमओला फोन केला. त्यानंतर शस्त्रसंधीवर बोलणी झाली.
हा मुद्दा नीट लक्षात घ्या... कारण दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीची बातमी सर्वप्रथम ट्रम्प यांनी दिली. त्यांनी अमेरिकेनं हे सर्व घडवल्याचा दावा केला. पण, भारतानं हा दावा फेटाळला आहे. अखेर पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी का तयार झाला, याची संपूर्ण टाइमलाइन समजून घ्या..
शनिवारी संध्याकाळ, 5.33 वाजता: डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चौथ्या दिवशी तणाव शिगेला पोहोचला होता. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. शनिवारी रात्री काय होईल, याकडं सर्व जगाचं लक्ष लागलं होतं.
पण संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी अचानक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यांनी या पोस्टमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा दावा केला.
( नक्की वाचा : India Pakistan Ceasefire भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबला, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताची घोषणा, पाहा Video )
'मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान पूर्णपणे आणि तात्काळ युद्धविरामावर सहमत झाले आहेत. दोन्ही देशांनी सामान्य कॉमन सेन्स समजूतदारपणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या विषयावर लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!' मात्र, ट्रम्प यांच्या या ट्विटमध्येही एक ट्विस्ट आहे.
सायंकाळी 5:37 वा., अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे पोस्ट
यानंतर 4 मिनिटांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, गेल्या ४८ तासांपासून ते आणि उप-राष्ट्रपती जेडी वेन्स पंतप्रधान मोदी आणि पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासह भारत आणि पाकिस्तानच्या उच्च नेत्यांच्या संपर्कात होते. मला आनंद आहे की भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत.
संध्याकाळी 5.38 वा., पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांचे पोस्ट
त्यानंतर बरोबर एका मिनिटानंतर इशाक डार यांचे पोस्ट येते. ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील त्वरित शस्त्रसंधीची पुष्टी करतात. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'पाकिस्तानने नेहमीच आपली सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत'!
सायंकाळी 5:54 वा., परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा
संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री एक छोटी पत्रकार परिषद घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संध्याकाळी वाजल्यापासून शस्त्रसंधीची घोषणा केली जाते. त्यांनी सांगितले की पाकिस्तानच्या लष्करी operations महासंचालकांनी (DGMO) 3 वाजून 35 मिनिटांनी भारतीय डीजीएमओला फोन केला आणि दोन्ही बाजूंमध्ये संध्याकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती झाली.
संध्याकाळी 6 वाजून 7 वा.: भारताने म्हटले- शस्त्रसंधीत तिसऱ्या देशाची भूमिका नाही
संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की शस्त्रसंधीवरील सहमती पूर्णपणे द्विपक्षीय आहे. याचाच अर्थ अमेरिकेचा त्यात सहभाग नव्हता. परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेत सांगितलेली तीच गोष्ट पुन्हा सांगण्यात आली की भारत आणि पाकिस्तान एकत्र मिळून शस्त्रसंधीवर सहमत झाले. भारताने यावेळी अमेरिकेनं मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळला.