IAS Avi Prasad Third Marriage: प्रशासकीय वर्तुळात सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे लग्न साधेसुधे नाही, तर दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने एकत्र येत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित आयएएस अधिकारी त्यांच्या तिसऱ्या लग्नामुळे सध्या संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या विवाहाची गुप्तता इतकी पाळण्यात आली होती की, मोजक्या नातेवाईकांशिवाय कोणालाही याची पुष्टी मिळत नव्हती.
दोन IAS अधिकारी विवाहबंधनात
मध्य प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी अवि प्रसाद यांनी पुन्हा एकदा लग्नाची गाठ बांधली आहे. त्यांनी 2017 बॅचच्या आयएएस अधिकारी अंकिता धाकरे यांच्यासोबत सप्तपदी घेतले आहेत.
अंकिता धाकरे यांनी यापूर्वी विविध जिल्ह्यांमध्ये एसडीएम म्हणून जबाबदारी सांभाळली असून, सध्या त्या मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी पदावर कार्यरत आहेत. अत्यंत साध्या आणि खाजगी स्वरूपाच्या या सोहळ्यात दोन्ही कुटुंबातील मोजकेच सदस्य उपस्थित होते.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
दोन वेळा घटस्फोट आणि आता तिसरे लग्न
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेल्या अवि प्रसाद यांचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांचे दोन विवाह झाले होते आणि त्यांच्या दोन्ही माजी पत्नी देखील आयएएस अधिकारीच आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या दोन्ही माजी पत्नी सध्या मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. पहिल्या दोन्ही पत्नींशी कायदेशीररीत्या घटस्फोट झाल्यानंतर अवि प्रसाद यांनी अंकिता धाकरे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
माजी पत्नी देखील जिल्हाधिकारी
अवि प्रसाद यांचे पहिले लग्न 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी रिजू बाफणा यांच्याशी झाले होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. रिजू बाफणा सध्या शाजापूर जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत. त्यानंतर अवि प्रसाद यांनी 2016 बॅचच्या आयएएस अधिकारी मिशा सिंह यांच्याशी दुसरे लग्न केले होते, पण हे नातेही फार काळ टिकू शकले नाही आणि त्यांचा लवकरच घटस्फोट झाला. आता दोन अयशस्वी लग्नांनंतर त्यांनी तिसऱ्यांदा संसार थाटला आहे.
( नक्की वाचा : UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेचे 12 नियम बदलले, OBC आणि EWS बाबत मोठे अपडेट, वाचा A to Z माहिती )
कुठे झालं लग्न?
या बहुचर्चित लग्नाचे ठिकाण अत्यंत खास निवडण्यात आले होते. अवि प्रसाद आणि अंकिता धाकरे यांनी श्योपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कुनो रिसॉर्टमध्ये 11 फेब्रुवारी रोजी गुपचुप लग्न केले. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या रिसॉर्टमध्ये अत्यंत गुप्तता पाळत हा विवाह सोहळा पार पडला. अवि प्रसाद हे सध्या मध्य प्रदेश रोजगार हमी परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. 2013 मध्ये त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली होती, मात्र त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी 13 वी रँक मिळवत आयएएस पद मिळवले होते. त्यांच्या या तिसऱ्या लग्नाची बातमी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.