UPSC 2026 New Rules: देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2026 च्या परीक्षेचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. यावर्षी 933 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून 24 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मात्र, यंदा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाने केलेल्या 12 मोठ्या बदलांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. यूपीएससीने केवळ अर्ज करण्याची पद्धतच बदलली नाही, तर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांपासून ते थेट आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या फेरपरीक्षेच्या संधीपर्यंत अनेक नियमात मोठे फेरबदल केले आहेत.
प्रशासकीय सेवेतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले असून, जे उमेदवार या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात यूपीएससीने केलेले हे 12 नवीन नियम नेमके काय आहेत.
1. चार टप्प्यांत पूर्ण करावी लागणार अर्ज प्रक्रिया
यूपीएससीने 2026 च्या परीक्षेपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पूर्णपणे पुनर्रचना केली आहे. आता उमेदवारांना आपला अर्ज चार वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये भरावा लागेल. यात खाते तयार करणे, युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (URN) मिळवणे, सामान्य अर्ज (CAF) भरणे आणि शेवटी विशिष्ट परीक्षेसाठी अर्ज करणे अशा चार टप्प्यांचा समावेश आहे. एकदा सामान्य अर्ज भरला की, भविष्यात इतर परीक्षांसाठी पुन्हा तीच माहिती भरण्याची गरज उरणार नाही.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
2. लाईव्ह फोटो कॅप्चर करणे आता अनिवार्य
आयोगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने फोटोच्या नियमात मोठा बदल केला आहे. अर्ज करताना उमेदवाराला सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड तर करावाच लागेल, पण त्यासोबतच एक लाईव्ह फोटो देखील कॅप्चर करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अपलोड केलेला फोटो आणि लाईव्ह घेतलेला फोटो एकमेकांशी जुळणे आवश्यक आहे. जर या फोटोमध्ये तफावत आढळली किंवा फोटो अस्पष्ट असेल, तर अर्ज नाकारला जाऊ शकतो.
3. आधार कार्ड आधारित पडताळणीला प्राधान्य
ओळख पटवण्यासाठी उमेदवारांना आधार कार्डचा वापर करण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे. जरी मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे चालणार असली, तरी आधार कार्डमुळे पडताळणी प्रक्रिया वेगाने आणि विनाअडथळा पार पडते, असे यूपीएससीने स्पष्ट केले आहे.
4. कोऱ्या कागदावर तीन वेळा स्वाक्षरी करून अपलोड करणे आवश्यक
स्वाक्षरीच्या बाबतीतही एक नवा नियम लागू झाला आहे. उमेदवारांना आता एका कोऱ्या कागदावर काळ्या शाईने तीन वेळा स्वाक्षरी करावी लागेल आणि त्याचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करावा लागेल. यामुळे कागदपत्रांच्या तपासणीवेळी उमेदवाराची ओळख पटवणे अधिक अचूक होणार आहे.
( नक्की वाचा : Akola News : स्पर्धा परीक्षांसाठी राहते घर मोफत; एका वकिलामुळे दानापूरमधील 27 विद्यार्थी बनले सरकारी अधिकारी )
5. अर्जात सुधारणा किंवा परत घेता येणार नाही
एकदा उमेदवाराने आपला अर्ज सबमिट केला की, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येणार नाही. तसेच, अर्ज भरल्यानंतर तो परत घेण्याची (Withdrawal) सुविधाही आता उपलब्ध नसेल. त्यामुळे अर्ज भरताना पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.
6. युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (URN) अपडेटसाठी एकच संधी
उमेदवारांचे कायमस्वरूपी प्रोफाइल म्हणून ओळखला जाणारा युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (URN) अपडेट करण्यासाठी उमेदवाराला संपूर्ण आयुष्यात फक्त एकच संधी मिळेल. यात केलेला बदल केवळ भविष्यातील अर्जांसाठी लागू असेल, आधी जमा केलेल्या अर्जांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
7. हॉल तिकीट फक्त ऑनलाइन स्वरूपातच मिळणार
यूपीएससी आता कोणत्याही उमेदवाराला टपालाने किंवा ईमेलने हॉल तिकीट पाठवणार नाही. उमेदवारांनी स्वतःच्या लॉगिनवरून ई-एडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे. परीक्षा केंद्रावर जाताना या डाउनलोड केलेल्या हॉल तिकीटाची प्रिंट आणि एक वैध फोटो ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे.
( नक्की वाचा : UPSC Calendar 2026: यूपीएससीनं प्रसिद्ध केलं 2026 चं कॅलेंडर, वाचा कधी होणार IAS, CDS, सह अन्य परीक्षा )
8. परीक्षा केंद्रावर चेहरा ओळखण्याची प्रक्रिया (Face Authentication)
परीक्षा केंद्रावर पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक उमेदवाराचे फेस ऑथेंटिकेशन केले जाईल. यामध्ये उमेदवाराच्या चेहऱ्याची पडताळणी आणि ओळखपत्राची तपासणी केली जाईल. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचणे गरजेचे आहे.
9. आयएएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी नाही
यूपीएससीने आयएएस (IAS) आणि आयएफएस (IFS) पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी नागरी सेवा परीक्षेत पुन्हा बसण्याचे मार्ग मर्यादित केले आहेत. हे अधिकारी पुन्हा परीक्षा देऊ शकणार नाहीत. मात्र, आयपीएस (IPS) अधिकारी आपली रँक सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
10. दिव्यांग उमेदवारांना आवडीचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा
दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी आयोगाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. 2026 पासून हे उमेदवार परीक्षा केंद्राची क्षमता पूर्ण झाली असली, तरी आपल्या आवडीचे केंद्र निवडू शकतील. इतर उमेदवारांसाठी मात्र केंद्र वाटप 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर असेल.
11. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांबाबत नवीन अटी
ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) श्रेणीतील उमेदवारांना आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24 आणि 2024-25 च्या उत्पन्नावर आधारित प्रमाणपत्र सादर करावे लागेल, जे 1 एप्रिल 2025 नंतर जारी केलेले असावे. त्याचप्रमाणे, ईडब्ल्यूएस उमेदवारांचे प्रमाणपत्र हे आर्थिक वर्ष 2024-25 च्या उत्पन्नावर आधारित असावे आणि ते देखील 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतरचे असावे.
12. पूर्व आणि मुख्य परीक्षेनंतर लॉगिन करणे बंधनकारक
यूपीएससीने दिलेल्या नव्या नियमानुसार, पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसांच्या आत उमेदवारांना अनिवार्यपणे लॉगिन करावे लागेल. तसेच, मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 15 दिवसांच्या आत लॉगिन करणे गरजेचे आहे. जे उमेदवार असे करणार नाहीत, त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world