Donald Trump News: जर शस्त्रसंधी केली नाही तर तुमच्यासोबत व्यापार करणार नाही असे म्हणत आपण आम्ही भारत आणि पाकिस्तानला इशारा दिला होता असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताची भूमिका मांडली, ज्यातून ट्रम्प यांचा दावा सपशेल खोटा असल्याचे दिसून येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. पहलगाम इथे निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते. यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी जिरली नव्हती. पाकिस्तानने भारतावर ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानांच्या सहाय्याने हल्ला केला. भारताने हे सगळे हल्ले परतवून लावलेच शिवाय उत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांचे मोठे नुकसान केले. या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
ट्रम्प यांचा दावा काय आहे ?
सोमवारी ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, "शनिवारी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये संघर्ष वाढू नये यासाठी मध्यस्ती केली आणि तातडीने शस्त्रसंधी घडवून आणली. दोन देशांतील परिस्थिती चिघळणार असे वाटत होते. दोन्ही देशांत शस्त्रसंधी व्हावी यासाठी आम्ही बरीच मदत केली. मी म्हटले कमॉन आपल्याला बराच व्यापार करायचाय. आता थांबा, जर थांबला नाही तर आम्ही व्यापार करणार नाही. व्यापाराचा ज्या पद्धतीने मी वापरलाय तसा इतर कोणीही वापरलेला नाही. अचानक दोन्ही देश म्हणाले की आम्ही थांबतो, आणि ते थांबले. आम्ही दोन्ही देशांसोबत बराच व्यापार करणार आहोत."
नक्की वाचा - Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
व्यापाराबद्दल चर्चाच नाही
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त रणधीर जायसवाल यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता त्यांनी म्हटले की, 'ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू झालं. 10 मे रोजी शस्त्रसंधी झाली. या दरम्यान भारत आणि अमेरिकामध्ये सतत चर्चा होत होती. यामध्ये व्यापाराचा मुद्दा कधीही चर्चेला आला नाही.' यामुळे ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आतापर्यंत 11 पाकिस्तानी जवान ठार
भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते.यानंतरही पाकिस्तानने आगळीक सुरूच ठेवल्याने भारताने पुन्हा हल्ला चढवला. यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांना भारताने लक्ष्य केलं होतं, ज्यामुळे नूर खान (चकलाला), रफिकी, मुरीद सुक्कर,सियालकोट,पसरूर,चुनियां, सरगोधा, स्कार्दू, भोलारी, जकोबाबाद इथल्या पाकिस्तानी लष्करी तळांना मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. इतकं सगळं होऊन, भारताने पुरावे देऊनही पाकिस्तान ही गोष्ट मान्य करण्या तयार नाहीये. मंगळवारी पाकिस्तानने एक गोष्ट मान्य केली की, भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 11 जवान ठार मारण्यात आले आहेत.
( नक्की वाचा : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story )
मृतांमध्ये स्क्वाड्रन लीडरचाही समावेश
भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्यामध्ये स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ, चीफ टेक्निशियन औरंगजेब, सीनियर टेक्निशियन नजीब, कॉर्पोरल टेक्निशियन फारूक आणि सीनियर टेक्निशियन मुबाशीर हे ठार मारले गेले आहेत. नाईक अब्दुल रहमान, लान्स नाईक दिलावर खान, लान्स नाईक इकरामुल्ला, नाईक वकार खालिद, सिपाही मुहम्मद अदील अकबर आणि सिपाही निसार हे देखील ठार झाले असल्याची माहिती पाकिस्तानी सैन्यातर्फे देण्यात आली आहे.