Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. 7 मे रोजी बुधवारी रात्री उशीरा भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर हे लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे राबवले.
- मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने एकूण 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यादरम्यान कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.
- हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराने त्याबद्दल ट्वीट केले आणि "न्याय झाला आहे, जय हिंद" असे म्हटले. लष्कराने हे देखील स्पष्ट केले की फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला केला जाईल. भारताचा हल्ला शेजारील देशाशी लढण्याच्या उद्देशाने केलेला नाही.
- भारताने कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये हवाई हल्ले केले आणि क्षेपणास्त्र डागले गेले. त्याचवेळी, भारताच्या हवाई हल्ल्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. पूंछ-राजौरी भागात पाकिस्तान सीमेपलीकडून गोळीबार करत आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला सतर्क ठेवण्यात आले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रात्रभर या कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवले. ऑपरेशन योजनेनुसार पुढे जात आहे याची खात्री करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी कमांडर्सशी सतत संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- हवाई हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचेही एक वक्तव्य आले आहे, ज्यात त्यांनी म्हटलं की, मला आशा आहे की हे लवकरच संपेल. ट्रम्प म्हणाले की, भूतकाळात थोडे डोकावून पाहिल्यावर आम्हाला काहीतरी घडणार आहे असे वाटले होते.
- भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चंदीगड, जम्मू, लेह आणि श्रीनगरला जाणाऱ्या सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने त्यांच्या सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्ताननेही आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
- भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर ए तोयबाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने हल्ल्यांसाठी हे ठिकाण निवडल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय दूतावासाच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, पहलगाम हल्ला हा पाकिस्तानचा कट होता याचे पुरावे भारताकडे आहेत. या हल्ल्यात 26 लोक ठार झाले.
- पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनुसार, पाकिस्तानवर भारतीय हल्ल्यात मृतांची संख्या 8 झाली आहे.
- भारतीय सैन्याने यशस्वीरित्या लक्ष्य केलेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानमध्ये आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे.
- पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यांचा निषेध करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्स वर म्हटले की, "पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. संपूर्ण देश पाकिस्तानच्या सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तान आणि पाकिस्तानी सशस्त्र दलांना शत्रूशी कसे सामोरे जायचे हे माहित आहे."