ATM in Train: रेल्वेतून लांबचा प्रवास करताना ट्रेनमध्येच एटीएम असावं असं अनेकदा वाटतं. त्यामुळे वाटेल तेव्हा पैसे काढता येऊ शकले असते. रोख पैशांची अडचण राहिलीच नसती. प्रवाशांची हीच अडचण दूर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनमध्येच एटीएमची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय रेल्वेने खास उपक्रम सुरु केला आहे, ज्यामुळे धावत्या ट्रेनमध्येही प्रवाशांना पैसे काढता येणार आहेत. सध्या या सुविधेची चाचणी सुरु आहे. मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एक एटीएम मशीन लावण्यात आलं आहे.
ऑनलाईन सुविधेऐवजी जे लोक रोखीने व्यवहार करतात त्यांच्यासाठी ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. तसेच रेल्वे प्रवासादरम्यान जवळील रोख पैसे संपल्यानंतर ज्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो, अशा प्रवशांना देखील या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.
पाहा VIDEO
एटीएम शोधण्याचा त्रास कमी होणार
एटीएमची सुविधा धावत्या ट्रेनमध्ये काम करते की नाही, याची तपासणी रेल्वेचे अधिकारी करत आहेत. नेटवर्क कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी, प्रायव्हसी यासह इतर गोष्टींची चाचपणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर पुढे इतर अनेक ट्रेन्समध्ये एटीएमची सुविधा पुरवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेतून बाहेर उतरून पैसे काढण्यासाठी एटीएमची शोधाशोध करावी लागणार नाही.
(नक्की वाचा- Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)
पंचवटी एक्सप्रेसची निवड का केली?
पंचवटी एक्सप्रेस ही मुंबई आणि नाशिक दरम्यान दररोज धावणारी इंटरसिटी ट्रेन आहे. एका बाजूने प्रवास करण्यासाठी सुमारे 4 तास 35 मिनिटे घेते. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच चांगली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये ही ट्रेन खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच या नवीन प्रयोगासाठी पंचवटी एक्सप्रेसची निवड करण्यात आली.