Indian Railways Fare Hike : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांच्या खिशावर आता थोडा भार पडणार आहे. रेल्वेने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेली भाडेवाढ उद्यापासून म्हणजेच 26 डिसेंबर 2025 पासून लागू होत आहे. रेल्वेने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले असून कोणत्या ट्रेनसाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागतील आणि कुठे कोणताही बदल झालेला नाही, याची सविस्तर यादी जाहीर केली आहे. सर्वसामान्य प्रवाशांपासून ते प्रीमियम ट्रेनने प्रवास करणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या नवीन बदलांची माहिती असणे आवश्यक आहे.
या प्रवाशांना मोठा दिलासा
रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार, उपनगरीय म्हणजेच लोकल ट्रेनच्या सिंगल तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय उपनगरीय आणि गैर-उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सीझन तिकिटांच्या (पास) दरातही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे नियमित पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जुन्याच दराने प्रवास करता येणार आहे.
कुठे झाली भाडेवाढ?
पॅसेंजर किंवा ऑर्डिनरी (नॉन-एसी) गाड्यांच्या दुसऱ्या श्रेणीच्या भाड्यात प्रवासाच्या अंतरावरून वाढ करण्यात आली आहे. यामध्ये 215 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतेही वाढीव भाडे आकारले जाणार नाही.
( नक्की वाचा : Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसल्यास होईल धावपळ )
मात्र 216 ते 750 किलोमीटरसाठी 5 रुपये, 751 ते 1250 किलोमीटरसाठी 10 रुपये, 1251 ते 1750 किलोमीटरसाठी 15 रुपये आणि 1751 ते 2250 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये जादा मोजावे लागतील.
यासोबतच ऑर्डिनरी गाड्यांच्या स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लाससाठी प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ करण्यात आली आहे.
मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे नवीन दर
मेल आणि एक्स्प्रेस (नॉन-एसी) गाड्यांच्या भाड्यातही बदल करण्यात आला आहे. यामध्ये सेकंड क्लास, स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लाससाठी प्रति किलोमीटर 2 पैसे इतकी वाढ लागू करण्यात आली आहे.
एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता जास्तीचे पैसे द्यावे लागतील. एसी चेअर कार, एसी 3 टायर, एसी 2 टायर आणि एसी फर्स्ट क्लास किंवा एक्झिक्यूटिव्ह क्लाससाठी देखील प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
व्हीआयपी आणि प्रीमियम रेल्वेला फटका
केवळ साध्या गाड्याच नव्हे, तर देशातील महत्त्वाच्या आणि प्रीमियम रेल्वेच्या भाड्यातही वाढ झाली आहे. राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, गरीब रथ, जन शताब्दी, अंत्योदय, गतिमान, युवा एक्सप्रेस आणि नमो भारत रॅपिड रेल यांसारख्या सर्व विशेष गाड्यांमध्ये त्यांच्या क्लासनुसार ही वाढ लागू होणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आता थोडा महागणार आहे.
महत्त्वाचे नियम आणि अटी
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, केवळ मूळ भाड्यात वाढ करण्यात आली असून रिझर्व्हेशन शुल्क, सुपरफास्ट चार्ज यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. जीएसटीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. ज्या प्रवाशांनी 26 डिसेंबर 2025 पूर्वी आपली तिकिटे आरक्षित केली आहेत, त्यांना ही वाढीव भाडेवाढ लागू होणार नाही.
मात्र 26 डिसेंबरनंतर टीटीईमार्फत बनवल्या जाणाऱ्या तिकिटांवर नवीन दर आकारले जातील. रेल्वे स्थानकांवरील भाड्याची यादी अपडेट केली जात असून तिकीट प्रणालीमध्येही आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world