जाहिरात

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसल्यास होईल धावपळ

Navi Mumbai International Airport Becomes Operational: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले असून मुंबई महानगर क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसल्यास होईल धावपळ
Navi Mumbai International Airport : मुंबई विमानतळावरील ताण आता कमी होणार आहे.
मुंबई:

Navi Mumbai International Airport Becomes Operational:  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले असून मुंबई महानगर क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी या विमानतळावरून व्यावसायिक विमान उड्डाणांना अधिकृतपणे सुरुवात झाली. यामुळे मुंबईतील विमानतळावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना प्रवासाचा एक नवीन आणि आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे.

कोणत्या कंपनीची विमान सेवा सुरु?

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या चार प्रमुख विमान कंपन्यांनी आपली सेवा सुरू केली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 30 डोमेस्टिक फ्लाईट्सचे परिचालन केले जाणार आहे. 

या विमानतळावर उतरणारे पहिले विमान इंडिगोचे असून ते सकाळी 8 वाजता बेंगळुरूवरून येईल. तर पहिले उड्डाण सकाळी 8.40 वाजता हैदराबादसाठी होईल. प्रवाशांसाठी टर्मिनल बिल्डिंग सकाळी 6.40 वाजता उघडण्यात आली आहे.

( नक्की वाचा : NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती )

सुरुवातीच्या टप्प्यातील कामकाज आणि वेळापत्रक

सध्या हे विमानतळ सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच कार्यरत असेल. पहिल्या दिवशी 9 देशांतर्गत शहरांसाठी 15 विमाने झेपावतील. येत्या काळात विमानांची संख्या वाढवून ती दररोज 24 उड्डाणांपर्यंत नेली जाणार आहे. 

याद्वारे 13 शहरांशी कनेक्टिव्हिटी जोडली जाईल. विमानतळाची क्षमता सध्या तासाला 10 विमानांच्या हालचाली हाताळण्याची आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत हे विमानतळ 24 तास सुरू ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा

नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांचा अनुभव सुखद व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. येथे पारंपारिक चेक-इन काउंटरसोबतच डिजी यात्रा ही कॉन्टॅक्टलेस सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. विमानतळावरील खाद्यपदार्थ आणि रिटेल शॉप्समध्ये स्थानिक आवडीनिवडी आणि सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतींकडे लक्ष देण्यात आले आहे.

सध्या पहिल्या टप्प्यात टर्मिनल 1 आणि एक धावपट्टी सुरू करण्यात आली असून, या टर्मिनलची वार्षिक क्षमता 20 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची आहे.

(नक्की वाचा : Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे 'हे' लोकनेते कोण? )

मुंबई आणि उपनगरांतून विमानतळावर पोहोचण्याचा मार्ग

मुंबई महानगर क्षेत्रातील विविध भागांतून विमानतळावर पोहोचण्यासाठी लागणारा अंदाजित वेळ आणि अंतर खालीलप्रमाणे आहे. वरळीहून अटल सेतू आणि उलवे-बेलापूर मार्गे 35 किमीचे अंतर 70 मिनिटांत पार करता येईल.

पवई आणि ठाण्यातून येणाऱ्या प्रवाशांना साधारण 60 ते 70 मिनिटे लागतील. बोरिवली किंवा गोरेगाव सारख्या पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना जेव्हीएलआर आणि वाशी खाडी पुलावरून 45 किमी अंतर कापण्यासाठी 95 मिनिटे लागू शकतात.

कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरच्या प्रवाशांना शीळफाटा आणि सायन-पनवेल हायवेवरून 37 किमी अंतरासाठी सुमारे 120 मिनिटे लागतील. तर मिरा रोडच्या प्रवाशांना घोडबंदर मार्गे 135 मिनिटांचा प्रवास करावा लागेल. 

नवी मुंबईतील प्रवाशांसाठी हे अंतर अवघे 14 किमी असून पाम बीच रोडवरून 30 मिनिटांत विमानतळ गाठता येईल. ऐरोली आणि बेलापूरमधील नागरिक ठाणे-बेलापूर रस्त्याचा वापर करू शकतात, तर खारघर आणि पनवेलमधील लोक कळंबोली सर्कलवरून विमानतळावर पोहोचू शकतील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com