जाहिरात

Train Ticket: रेल्वे तिकिटांचा संपूर्ण पॅटर्न बदलणार! वेटिंग तिकिटांचा सस्पेन्स एका क्लिकवर संपणार, वाचा अपडेट

Train Ticket Booking System: भारतीय रेल्वे आपल्या तिकिट बुकिंग यंत्रणेत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत आहे.

Train Ticket: रेल्वे तिकिटांचा संपूर्ण पॅटर्न बदलणार! वेटिंग तिकिटांचा सस्पेन्स एका क्लिकवर संपणार, वाचा अपडेट
Train Ticket Booking System: हे नवीन सिस्टीम तब्बल 1986 पासून चालत आलेल्या जुन्या यंत्रणेची जागा घेणार आहे.
मुंबई:

Train Ticket Booking System: भारतीय रेल्वे आपल्या तिकिट बुकिंग यंत्रणेत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून रेल्वेचे तिकीट बुकिंग सिस्टीम टप्प्याटप्प्याने नवीन पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीमवर म्हणजेच पीआरएसवर शिफ्ट केले जाणार आहे. हे नवीन सिस्टीम तब्बल 1986 पासून चालत आलेल्या जुन्या यंत्रणेची जागा घेणार आहे.

तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी करणे, सिस्टीमची क्षमता वाढवणे आणि प्रवाशांना डिजिटल बुकिंगचा एक उत्तम अनुभव देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे भवन येथे या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला असून, या बदलाच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काय आहे बदल?

सध्या रेल्वेमध्ये वापरले जाणारे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम वर्ष 1986 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यात खूपच कमी बदल झाले होते. मात्र, आता हे सिस्टीम पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानासह सज्ज करण्यात आले आहे. यामुळे आता बुकिंगचा वेग वाढणार असून एकाच वेळी अधिक तिकिटे हाताळणे सिस्टीमला सहज शक्य होणार आहे. 

भारतीय रेल्वेने वर्ष 2002 मध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुरुवात केली होती. आजच्या काळात रेल्वे काउंटरवर जाण्याऐवजी लोक ऑनलाइन तिकीट काढण्यालाच पहिली पसंती देतात. सध्या रेल्वेची तब्बल 88% तिकीट बुकिंग ही डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच होत आहे.

( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )

रेलवन ॲप ठरतेय प्रवाशांसाठी अधिक सोयीचे

तिकीट बुकिंग यंत्रणेत केला जाणारा हा मोठा बदल रेल्वेच्या डिजिटल योजनेचाच एक भाग आहे. जुलै 2025 मध्ये लाँच झालेल्या रेलवन (RailOne) ॲपने अवघ्या एक वर्षापेक्षा कमी कालावधीत 3.5 कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे. या एकाच ॲपच्या मदतीने प्रवाशांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी मिळत आहेत. यामध्ये तिकीट बुक करणे आणि कॅन्सल करणे, ट्रेनचे लाईव्ह स्टेटस तपासणे, प्लॅटफॉर्म आणि कोचची माहिती मिळवणे तसेच तक्रार नोंदवणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या ॲपच्या माध्यमातून दररोज सुमारे 9.29 लाख तिकिटे बुक केली जातात. यामध्ये साधारण 7.2 लाख जनरल तिकिटे आणि 2.09 लाख आरक्षित (रिझर्व्ह) तिकिटांचा समावेश असतो.

( नक्की वाचा : पनवेलकरांची बल्ले बल्ले! कर्जत अवघ्या काही मिनिटांवर; नवा रेल्वे मार्ग ते पार्किंगपर्यंत सगळं काही 'अपडेट' )

कशी समजणार तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता?

या नवीन सिस्टीमचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वेटिंग लिस्ट प्रेडिक्शन सुविधा देण्यात आली आहे. या फिचरची सुरुवात या वर्षाच्या सुरुवातीलाच करण्यात आली होती. याद्वारे प्रवाशांना त्यांचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे, याची अचूक माहिती मिळते. 

रेल्वेच्या दाव्यानुसार, या एआय फिचरची अचूकता पूर्वी केवळ 53% होती, ती आता वाढून थेट 94% वर पोहोचली आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे झाले आहे. ऑगस्टपासून हे नवीन सिस्टीम पूर्णपणे सुरू झाल्यानंतर तिकीट बुकिंग अधिक वेगवान, स्मार्ट आणि विश्वासार्ह बनवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com