मध्य पूर्वेतील वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराण आणि इस्त्रायलमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या देशांमध्ये प्रवास करू नका असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जारी केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, इराण-इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी तातडीने तेथील भारतीय दूतावासाशी संपर्क करा. आपली नोंदणी करून घ्या, सर्वांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं.
अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलचा एक रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर भारताने प्रवासाची नियमावली जाहीर केली आहे. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलने इराण पुढील दोन दिवसात इस्त्रायलवर हल्ला करू शकतो असा दावा आपल्या रिपोर्टमध्ये अमेरिकेच्या इंटेलिजन्सचा हवाला देत केला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तांनुसार, इराण इस्त्रायलवर आण्विक हल्ला करू शकतो.
1 एप्रिल रोजी इस्त्रायलने सीरियामध्ये एअरस्ट्राइक केला...
1 एप्रिल रोजी इस्त्रायलने सीरियामध्ये इराणी दूतावासजवळ एअरस्ट्राइक केला होता. यामध्ये इराणचे दोन मुख्य आर्मी कमांडरसह 13 जणांचा मृत्यू झाला. यानंतर इस्त्रायलशी सूड उगवला जाईल असा इशारा इराणने दिला होता. सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये 1 एप्रिल रोजी कॉसुलेटवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलला याचे परिणाम भोगावे लागतील असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. मात्र हा हल्ला कधी आणि कसा होईल याबाबत नेमकी माहिती नाही. दश्मिक हल्ल्यात तीन वरिष्ठ सैन्य कमांडर सह 7 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये मोहम्मद रेजा जाहेदी यांचाही मृत्यू झाला. रेजा हे इस्लामिक रेवोल्युशनरी गार्ड कोरचे ग्राऊंड आणि एअर फोर्सचे माजी कमांडर होते. सीरिया आणि लेबनॉनमध्ये इराणच्या प्रॉक्सींशी समन्वय साधण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत होते.
इराण किंवा इराणच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या संघटना इस्त्रायलवर हल्ला करीत असा संशय अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांकडून व्यक्त केला जात आहे. हा हल्ला ईद पूर्वी किंवा त्यानंतर केला जाऊ शकतो, अशीही माहिती आली आहे. मात्र येत्या काही दिवसात हा हल्ला होईल अशी माहिती समोर येत आहे.