देशातील पहिल्या किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. वाराणसीतून अखिल भारत हिंदू महासभेने हेमांगी सखी यांना तिकीट दिलं आहे. 12 एप्रिलला त्या बनारसला पोहोचतील आणि बाबा विश्वनाथ यांचे आशीर्वाद घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत महामंडलेश्वर हेमांगी सखी म्हणाल्या, संपूर्ण देशभरात किन्नर समाजाची स्थिती दयनीय आहे. ट्रान्सजेंडर समुदायासाठी एकही जागा आरक्षित केलेली नाही. ट्रान्सजेंडर समुदाय लोकसभा आणि विधानसभेत आपले विचार कसे मांडतील? नपुंसक समाजाचे नेतृत्व कोण करणार?
अर्धनारीश्वराचा पडला विसर..
सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा दिला. आम्हाला याचा आनंद आहे. मुली जगतजननीचं रूप आहे. मात्र सरकार अर्धनारीश्वराला विसरली. असा नारा आम्हालाही ऐकायला आहे. केंद्र सरकारने ट्रान्सजेंडर पोर्टल जारी केलं, मात्र किन्नरांना याबाबत माहिती आहे का? जे रस्त्यावर भीक मागतात त्यांना असं काही पोर्टल असल्याची माहितीही नाही. सरकारने पोर्टल सुरू केलं, मग त्याचा प्रसार का केला नाही? किन्नर बोर्ड तयार करून काहीच होणार नाही. सरकारला किन्नर समाजासाठी एक जागा आरक्षित करावी लागेल, त्यानंतर परिस्थिती बदलेल. आज भाजप सरकारने किन्नरांसाठी आपली कवाडं खुली केली असती तर हेमांगी सखीला हे पाऊल उचलावं लागलं नसतं. हिंदू महासभाने किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आपलं म्हणणं समाजासमोर मांडण्यासाठी मला उमेदवारी दिल्याचं हेमांगी सखी म्हणाल्या.